सध्या सर्वत्र मकरसंक्रांतची धामधूम पाहायला मिळत आहे. या निमित्ताने घराघरांत तिळाचे लाडू, चिक्की असे अनेक पदार्थ बनवले जात आहेत. तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला, असे म्हणत तिळगुळ वाटून प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या जातात. सध्या अनेक सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहात मकरसंक्रांतीचा सण साजरा करताना दिसत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही अनोख्या पद्धतीने चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे यानिमित्ताने सचिनने पहिल्यांदाच स्वत:च्या हाताने तिळगुळाचे लाडू बनवले आहेत. त्याचा व्हिडीओही त्याने शेअर केला आहे.
सचिन तेंडुलकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. सचिनने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला सचिनने “तिळगुळ बनवण्याचा माझा पहिला प्रयत्न!”, असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : साडी, चंद्रकोर अन् नाकात नथ; सचिन तेंडुलकरच्या लेकीचा मराठमोळ्या लूकमधील फोटो व्हायरल
या व्हिडीओत सचिन हा स्वयंपाकघरात तिळगुळाच्या लाडूची रेसिपी सांगताना दिसत आहे. तिळगुळ बनवताना तो तिळगुळ कसा बनवायचा याची रेसिपीही अत्यंत रंजक पद्धतीनं सांगताना दिसत आहे. या व्हिडीओच्या शेवटी त्याने स्वत: बनवलेल्या लाडूची चव चाखत सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
सचिनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “क्रिकेटचा देव आणि प्रत्यक्षपणे पण देव सुसंस्कृत सचिन रमेश तेंडुलकर! खरोखरच तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच! तुम्हाला पण संक्रांतीच्या शुभेच्छा!” अशी कमेंट सचिनच्या एका चाहत्याने केली आहे. तर “एकाने पहिला लाडू देवाला, दुसरा लाडू क्रिकेटच्या देवाला” अशी कमेंट केली आहे.