Shocking Video Viral : सोशल मीडियावर भोंदू बाबा, मातांचे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. त्यातून अनेकदा ते लोकांमध्ये विविध प्रकारे अंधश्रद्धा पसरवीत असल्याचे दिसते. कधी तव्यावर बसणारा बाबा, कधी पाण्यावर तरंगणारा बाबा, तर कधी फिरता पंखा थांबवीत आशीर्वाद देणारा बाबा. या बाबांसह काही स्वत:ला देवीचा अवतर समजणाऱ्या मातांचीही कमी नाही. या वेगवेगळ्या प्रकारच्या बाबा, मातांच्या धक्कादायक प्रतापाचे किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. त्यातच आता माता राणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात ती एका मुक्या चिमुकलीबरोबर अतिशय जीवघेणे कृत्य करताना दिसतेय, जे पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, जिथे ज्या शारीरिक वा मानसिक आजार वा त्रासांमध्ये डॉक्टरांच्या उपचारांनी काही फरक पडत नाही तेव्हा अनेक लोक अशा भोंदू बाबा, मातांच्या अंधश्रद्धेला बळी पडतात. आपल्या कुटुंबातील व्यक्ती त्या त्रासातून लवकर बरे वाटावेयासाठी अशा बाबा, मातांसमोर नमस्तक होतात. पण, अनेकदा हे बाबा, बुवा, माता उपचारांच्या नावाखाली जीवघेणे प्रकार करताना दिसतात, जे पाहून कोणालाही संताप येईल. या व्हिडीओतही माता राणी चिमुकलीसह असाच काहीसा गैरप्रकार करताना दिसतेय.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, लाल रंगाची साडी नेसलेली माता राणी लोकांच्या गर्दीत बसली आहे, तिच्या मांडीवर एक चिमुकली आहे, जी बोलू शकत नाही, असे सांगितले जातेय. यावेळी तिला बोलते करण्यासाठी माता राणी तिला अक्षरश: छातीवर जोरजोरात मारतेय, १० ते १५ वेळा तिने चिमुकलीच्या छातीवर जोरात मारले. त्यानंतर तिचा एक हात पकडून हवेत उचलले. नंतर तिच्या तोंडाचं चुंबन घेतले. या सर्व घटनेत चिमुकली जीवाच्या आकांताने ओरडतेय, रडतेय; पण माता राणी काय तिचे जीवघेणे कृत्य काही थांबवत नाही. हे दृश्य पाहून सोशल मीडियावर लोक तीव्र संताप व्यक्त करतायत. अनेकांनी या माता राणीवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

@ummeed27news नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. युजर्स या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिलेय की, धर्माच्या नावावर हा ढोंगीपणा सुरू आहे. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, हरामखोर, एवढ्या छोट्या मुलीला मारतेय. तर, अनेकांनी या माता राणीवर कडक कारवाईची मागणी केली आहे. पण. हा व्हिडीओ केव्हाचा आणि कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.