रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे सतत चर्चेत असतात. शिवाय त्यांच्या यशस्वी वाटचालीमुळे, उद्योग क्षेत्रात काही करण्याची इच्छा असणारे तरुण वर्गात त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. मोठ्या लोकांनी केलेली छोटी वक्तव्य देखील लाखमोलाचा सल्ला देतात असं आपण ऐकलं आहे. सध्या असंच एक वक्तव्य मुकेश अंबानी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचं खूप कौतुक होत आहे.
पंडित दिनदयाळ एनर्जी युनिव्हर्सिटीच्या दिक्षांत समारोहाच्या कार्यक्रमात बोलत असताना मुकेश अंबानी यांनी 4G आणि 5G च्या मागे धावणाऱ्या तरुणाईला एक मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “आजकाल प्रत्येकजण 4G-5G च्या मागे आहे, परंतु या जगात आई आणि वडिलांपेक्षा (माता जी पिता जी) यांच्यापेक्षा मोठा G कोणीही नाही.
प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की, आपल्या यशामागे पालकांचा खूप मोठा आधार असतो. आपली स्वप्ने पूर्ण होण्याची ते आतुरतेने वाट पाहत असतात.” अंबानी यांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. दरम्यान, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात मोठी स्वप्न पाहायला हवीत, जेणेकरुन तुम्ही ती प्रत्यक्षात पुर्ण करु शकाल असंही ते या कार्यक्रमात म्हणाले.
देशाची अर्थव्यवस्था टॉप ३ मध्ये –
आणखी वाचा- भारीचं! आता WhatsApp घेऊन आलाय तगडा फीचर, एका क्लिकमध्ये पाठवू शकता ‘इतक्या’ लोकांना मेसेज
भारतीय अर्थव्यवस्था सध्या ३ ट्रिलियन डॉलर्सची असून सन २०४७ पर्यंत ती १३ पटींनी वाढून ४० ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल आणि जगातील टॉप ३ अर्थव्यवस्थेमध्ये ती स्थान मिळवेल असा विश्वास त्यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. तसंच आतापासून २०४७ सालापर्यंतचा काळ हा देशासाठी अमृत काळ आहे. ज्यावेळी भारत आपल्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असेल, त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था खूप मोठी आणि आश्चर्यकारक झेप घेईल असंही ते म्हणाले.