ड्रेसवर मॅचिंग नेलपेंट लावण्याची सवय असणा-या प्रत्येक तरुणींसाठी धक्कादायक बातमी आहे कारण या सवयीमुळे तुमच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी ड्युक विद्यापीठ आणि पर्यावरण कृती समितीने नेल पॉलिशबाबत केलेले एक संशोधन समोर आणले आहे. नेल पॉलिशमध्ये असणा-या काही घटकामुळे वजन वाढते असा दावा या संशोधनात केला आहे. मुख्यत्त्वे महागड्या ब्रँडेड नेल पॉलिशमध्ये वजन वाढण्यासाठी कारणीभूत असलेले घटक आढळल्याचे या संशोधनात म्हटले आहे. नेल पॉलिश अधिक काळ टिकावी यासाठी तिच्यामध्ये ट्रायफेनल फॉस्फेट नावाचे रसायन वापरले जाते. प्लॅस्टिक किंवा लाकडी फर्निचर आगरोधक बनवण्यासाठी देखील हे रसायन वापरले जाते. या रसायनामुळे हॉर्मोन्समध्ये बदल होऊन वजन वाढू शकते असाही दावा त्यांनी केला आहे.
हे प्राथमिक स्वरुपाचे संशोधन असून यावर अधिक संशोधन व्हायचे आहे. एकून ३ हजार ब्रँडेड नेल पॉलिशपैकी ४९ टक्के नेल पॉलिशमध्ये हे रसायने आढळले आहे. अधिक पारदर्शक असणा-या नेल पॉलिशमध्ये ट्रायफेनल फॉस्फेटचे प्रमाण अधिक आहे. ज्या महिलांना वारंवार नेल पॉलिश लावण्याची सवय असते अशा महिलांना वजन वाढण्याचा धोका अधिक आहे त्यामुळे या संशोधनात महत्त्वाची भूमिका असलेल्या पर्यावरण कृती समितीने ट्रायफेनल फॉस्फेटची मात्रा अधिक असलेल्या कंपनीला पत्र पाठवून त्याजागी पर्यायी आणि सुरक्षित रसायने वापरण्याचा सल्ला दिला आहे. सध्या नेल पॉलिशमुळे वजन वाढते या दोघांनी केलेल्या दाव्यावर सखोल संशोधन सुरू आहे.