टॅटू काढण्याची क्रेझ आजकाल तरूणांमध्ये खूपच वाढत चालली आहे. कोणी देव-देवतांचे टॅटू काढतं तर कोणी नावांचे, आजकाल संस्कृतमध्येही टॅटू काढण्याचा ट्रेंड वाढत आहे. हा ट्रेंड भारतातच नाही तर परदेशातही आहे. अनेक हॉलीवूड स्टार आणि पॉप स्टारच्या शरीरावर संस्कृत श्लोकांचे टॅटू पाहायला मिळतात. टॅटूंच्या या ट्रेंडमध्ये अर्धविराम असलेल्या टॅटूचा ट्रेंडही सुरू झाला आहे. त्यामुळे तुम्हाला सोशल मीडियावर अर्धविरामाच्या चिन्हाचे टॅटू काढलेले अनेक फोटो दिसतील. हे फोटो व्हायरल होण्यामागे किंवा अनेकांना असे टॅटू काढण्यासाठी प्रवृत्त करण्यामागे एक चळवळ आहे. ही चळवळ साधरण तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ मध्ये सुरू झाली.
वाचा : जीन्सला हा छोटा कप्पा का असतो माहितीये?
ताण तणाव, प्रेमभंग, अपयश अशा अनेक पाय-या चढत प्रत्येकाचा आयुष्याचा प्रवास सुरू असतो. या प्रवासात अनेक जण खचून जातात, नैराश्य येते, कधी कधी हे नैराश्य इतके वाढते की आयुष्य संपवावेसे वाटते. म्हणूनच नैराश्याने ग्रासलेल्या या पिढीला बाहेर काढण्यासाठी ही चळवळ सुरु झाली. ही चळवळ कोणी, कुठे सुरु केली याची फारशी माहिती नाही. या चळवळीचे ‘अर्धविराम’ हे प्रतिक आहे. प्रेमभंग, अपयश या सगळ्या गोष्टीमुळे आयुष्याला पूर्णविराम नाही तर अर्धविराम लागतो आणि या अर्धविरामानंतर दुसरं आयुष्य सुरू होऊ शकते हा साधा सोपा अर्ध या टॅटूचा आहे. त्यामुळे अर्धविरामाचे टॅटू शरीरावर कोरून जागृती करण्याच्या हेतूने ही चळवळ सुरू करण्यात आली आहे.
वाचा : NNTR, YMMD, DGMW या शॉर्टकटचे फुलफॉर्म माहितीयत का तुम्हाला ?