जपानमध्ये १५९ तासांचा ओव्हरटाइम केल्यानंतर एका महिला पत्रकाराचा मृत्यू झाल्याचे उघड झालं आहे. मिवा सादो असं तिचं नाव असून २०१३ मध्येच तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर ४ वर्षांनी तिच्या सहकाऱ्याने मृत्यूला कारणीभूत असलेल्या गोष्टींचा पाठपुरावा केला आणि ही धक्कादायक माहिती उघड केली.
गावकऱ्यांनी चक्क भलामोठा अजगर तळून खाल्ला!
मिवा ही जपानच्या राष्ट्रीय प्रसारण सेवेत राजकीय पत्रकार म्हणून काम करायची. कामाचा व्याप इतका होता की मिवा रोज ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबून काम करू लागली. तिने तीस दिवसांत फक्त दोन सुट्ट्या घेतल्या होत्या. कामाच्या ताणामुळे तिचं आपल्या तब्येतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि २०१३ मध्ये तिचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या घटनांची चौकशी तिच्या सहकाऱ्यांनी केली तेव्हा अतिरिक्त तास काम केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे जपानमधला ओव्हरटाईमचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोत आला आहे.
कामाच्या वेळा या ठरलेल्या असताना देखील जपानमधील अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त तास थांबवून ठेवतात. अनेकजण पैसे मिळत असल्याने थांबून काम करतात. मार्च २०१६ च्या आसपास जपानमधली जवळपास २ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कामाचा ताण सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचं सरकारी अहवालातून समोर आलं होतं. तर २०१५ मध्ये एका चोवीस वर्षांच्या तरूणीने कामाचा ताण सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली होती. सुट्टी न घेता तिने १०० तास काम केलं होतं. तेव्हापासून जपानमध्ये कंपनीतील कामाचे अतिरिक्त तास कमी करण्याची मागणीने जोर धरला आहे. मात्र, यावर अद्यापही तोडगा निघाला नाही.
ओला कॅबमध्ये महिलेची प्रसूती; कुटुंबाला कंपनीकडून स्पेशल गिफ्ट