खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी दिवसाचे १० ते १२ तास सतत काम करत असतात. त्यातच लॉकडाउननंतर वर्क फ्रॉम होमची पद्धत सुरु झाली आणि कामांच्या तासांमध्ये आणखीच वाढ झाली. यानंतर कर्मचाऱ्यांना मानसिक ताण येण्याच्या प्रकारणांमध्येही वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र अशीही एक कंपनी आहे जी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहे. ही कंपनी कोणती आहे आणि आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तिने कोणती पाऊले उचलली आहेत, ते जाणून घेऊया.
या कंपनीचं नाव आहे ‘मिशो’. ई-कॉमर्स साइटवरील सर्वांत स्वस्त उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या मिशो कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत त्यांना ११ दिवसांचा ब्रेक देण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या सुदृढ मानसिक आरोग्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितलं जातंय. या कंपनीने ११ दिवसांसाठी ‘रिसेट आणि रिचार्ज ब्रेक’ची घोषणा केली आहे.
‘इंजिनिअर सोडून कोणीही चालेल’; लग्नाच्या जाहिरातीत स्पष्टच उल्लेख, Photo Viral
आपल्या वेबसाइटच्या माध्यमातून कंपनीने ही माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमाचा उद्देश कर्मचार्यांना केवळ कामातून पूर्ण सुट्टी देणे नाही तर सणासुदीच्या विक्रीच्या या व्यस्त कालावधीनंतर कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेणे हा आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीटीओ संजीव बर्नवाल यांनीही ट्विटरवर ही घोषणा केली आहे. त्यांच्या ट्वीटनुसार, कार्य जीवन संतुलनाचा आधारेच चांगले मानसिक आरोग्य तयार केले जाऊ शकते.
संजीव बर्नवाल यांनी पुढे म्हटलंय, “आम्ही सलग दुसऱ्या वर्षी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी ११ दिवसांचा ब्रेक जाहीर केला आहे. आगामी सणांमुळे आणि जीवनातील समतोल राखण्याचे महत्त्व लक्षात घेऊन, मिशो कंपनी २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत रिसेट आणि रिचार्जसाठी काही आवश्यक वेळ काढणार आहे.”