फिरण्याला वयाचे बंधन कशाला हवे? मनाला वाटेल तिथे जाऊन त्या त्या ठिकाणचा आनंद घेता यायला हवा. काहींसाठी हेच तर आयुष्य असतं. वाढत्या वयाच्या अनेक तक्रारी घेऊन रडत बसण्यापेक्षा या आजींना फक्त आणि फक्त जग फिरायचे आहे आणि जगण्याचा आनंद घ्यायचा आहे. केरळमध्ये राहणा-या अन्नाकुट्टी सायमन आजींचे वय आहे फक्त ९५ वर्ष. जर्मनी, फ्रान्स, दुबई अशा अनेक देशांची सफर त्यांनी केली आहे पण एवढ्यावर त्यांना थांबायचे नाही तर त्यांना आणखी जग फिरायचे आहे.
केरळमध्ये राहणा-या अन्नाकुट्टी आजी यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अनेक देश पालथे घातले आहेत. मनात आले की आजी एकट्याच निघतात, बरं आजींना मल्ल्याळी सोडून इतर कोणतीही भाषा बोलता येत नाही. पण जग फिरायला भाषा कशाला हवी? आजी सहज विचारतात. आपल्याला काही अडचण आलीच तर मल्ल्याळीतच आपण बोलतो समोरचा त्याला जे समजते तसे मला समजवण्याचा प्रयत्न करतो असेही आजीने द न्यूज मिनिटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
आजींनी इटली, जर्मनी, दुबई, इस्त्राईल अशा अनेक देशांचा प्रवास केला आहे. आजींच्या कुटुंबात ७० सदस्य आहेत पण नेहमी आजी एकट्यानेच प्रवास करतात. पांढरी पारंपारिक साडी आणि दागिने घालूनच आजी फिरतात. हिच तर आजींची ओळख आहे. आपली ओळख फुसून कसं चालणार? आजी विचारतात. ७५ वर्षांच्या असताना आजीने आपला पहिला प्रवास सुरू केला होता. इटली, जर्मनी, इस्त्राईल, फ्रान्स आणि दुबई चार वेळा आजी फिरून आल्या आहेत. आता आजीला जगातील ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माची पवित्र जागा असलेल्या जेरूसलेमध्ये जायचे आहे पण वयामुळे मात्र त्यांना व्हिसा मिळला नाही.