Anand Mahindra Wife And Daughter : आनंद महिंद्रा हे देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. क्रिएटिव्ह व्हिडीओ, फोटोंच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात असतात. अनेकदा प्रेरणादायी किंवा माहितीविषय ट्विट करत ते लोकांना जागरुक करतात. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, तसेच अनेकदा महिंद्रा स्वत:देखील त्यांच्याविषयी फार कमी वेळा बोलताना दिसतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला आनंद महिंद्रा यांच्या पत्नी कोण, त्यांना किती मुलं आहेत आणि ती सध्या काय करतात, याविषयीची माहिती देणार आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या पत्नीविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. आनंद महिंद्रा यांच्या पत्नीचे नाव अनुराधा महिंद्रा असे आहे आणि त्या एक यशस्वी उद्योजिका आणि पत्रकार आहेत. तसेच त्या महिंद्रा लक्झरी लाइफस्टाइल मॅगझिन Verve च्या संस्थापक असून त्यांनी ‘मेन्स वर्ल्ड’ मासिकही सुरू केले आहे.
अनुराधा महिंद्रा यांनी मुंबईतील सोफिया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचवेळी त्यांची भेट आनंद महिंद्रा यांच्याशी झाली. आनंद हे तेव्हा इंदौरमध्ये आपल्या पदवीसाठी एक प्रोजेक्ट फिल्म बनवत होते. यावेळी अनुराधा केवळ १७ वर्षांच्या होत्या. पहिल्या भेटीतच आनंद महिंद्रा अनुराधा यांच्या प्रेमात पडले, यावेळी त्यांनी अगदी फिल्मी अंदाजात अनुराधा यांना प्रपोज केले.
आनंद महिंद्रा यांनी अनुराधा यांना आईची अंगठी गिफ्ट करत प्रपोज केले. यानंतर दोघेही लग्न करून अमेरिकेत गेले. तिथे अनुराधा यांनी बोस्टन विद्यापीठातील कम्युनिकेशन प्रोग्रॅममध्ये शिक्षण पूर्ण केले.
आनंद महिद्रांना किती मुलं?
आनंद आणि अनुराधा महिंद्रा यांना दिव्या आणि अलिका या दोन मुली आहेत. दिव्या महिंद्रा यांनी २००९ मध्ये न्यूयॉर्कमधील ‘द न्यू स्कूल’मधून डिझाईन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. २०१६ मध्ये ती Verve मासिकाची आर्ट डायरेक्टर बनली. फ्रीलान्सर म्हणून काम करत तिने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. न्यूयॉर्कमधील आर्किटेक्ट जॉर्ज जपाटा याच्याबरोबर दिव्याचे लग्न झाले आहे.
तर आनंद महिंद्रा यांची धाकटी मुलगी अलिका महिंद्रा हिचे लग्न फ्रेंच नागरिकत्व असलेल्या व्यक्तीशी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलिका सध्या न्यूयॉर्कमध्ये राहते, पण ती कौटुंबिक व्यवसायात सक्रियपणे सहभागी नाही. दोघी बहिणी चर्चा, गॉसिप्स आणि लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात.
आनंद महिंद्रा यांचा जन्म १ मे १९५५ रोजी झाला. २०१२ मध्ये ते महिंद्रा समूहाचे अध्यक्ष झाले. महिंद्रा समूह हा ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, कृषी व्यवसाय आणि आयटीसह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेला समूह आहे. आनंद महिंद्रा हे कंपनीच्या सह-संस्थापकांपैकी एक जगदीश चंद्र महिंद्रा यांचे नातू आहेत.