खरंतर सदृढ आणि निरोगी आयुष्य असणं सगळ्यांना आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीत आपल्याला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. तब्येतीवर परिणाम झाला आणि पाणी डोक्यावरून जाऊ लागलं की आपण आपली काळजी घ्यायला सुरूवात करतो. मग चांगलं आणि पौष्टिक खाणं असो, नियमित व्यायाम असो किंवा आणखी काही. पण इथेही बघा ना नव्याचे नऊ दिवस. आपण उत्साहात आरोग्याची काळजी घ्यायला सुरूवात करतो, व्यायाम करतो, उठून धावायाला जातो किंवा जिमही जॉईन करतो. पण हे फक्त काहीच दिवस. नंतर नंतर सगळीच नवलाई संपते आणि रोज रोज व्यायाम न करण्याचे आपण बहाणे शोधू लागतो. आता तुमचाही असाच काही अनुभव असेल तर या प्राण्याकडून काहीतरी शिका .
अहो ही मस्करी वगैरे अजिबात नाही. खरं तेच सांगतोय. हा कुत्रा आपल्या तब्येतीची इतकी काळजी घेतो की आपल्या मालकीणी बरोबर तो नियमित व्यायाम करायला देखील येतो. तुमचा विश्वास बसत नाहीय ना? मग त्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा.
काय मग विश्वास बसला की नाही? या कुत्र्याचं नाव आहे रिप्टाइड. याला व्यायामाची गोडी इतकी आहे की आपल्या मालकीण आणि तिच्या मैत्रिणींसोबत तो नियमीत व्यायाम करायला येतो. व्यायामातले बरेचसे प्रकारही त्याला माहिती आहेत आणि आपल्या फिटनेसला महत्त्व देण्याऱ्या रिप्टाइडचे इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सही आहेत बरं का! तेही थोडे थोडके नाही तर तब्बल सात हजारांहूनही अधिक. आता हा प्राणी असून आपल्या तब्येतीची एवढी काळजी घेतोय तर आपण थोडासा आळस झटकून आपल्या तब्येतीवर थोडं लक्ष द्यायला काय हरकत आहे?