आत्मविश्वासाच्या जोरावर अडचणींवर मात करत असाध्य ते साध्य करू शकतो हे १६ वर्षीय स्पर्श शाहने सिद्ध करून दाखवलं. ह्युस्टनमधील ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमात स्पर्शने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत जवळपास ५० हजार प्रेक्षकांसमोर भारताचे राष्ट्रगीत गायलं. स्पर्शला जन्मापासून ऑस्टिओजेनेसीस इम्पर्फेक्टा (osteogenesis imperfecta) या आजाराने ग्रासलं आहे. या आजारात हाडे ठिसूळ होतात. हलका मार लागला तरी हाडे मोडतात. हा गंभीर आजार असूनही स्पर्शने हार मानली नाही.

अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये राहणारा स्पर्श गायक व रॅपर आहे. त्याने ‘कौन बनेगा करोडपती’च्या ग्रँड फिनालेमध्ये परफॉर्म केलं होतं. यावेळी त्याने अमिताभ बच्चन यांच्यावर लिहिलेलं एक रॅप साँगसुद्धा सादर केलं होतं. स्पर्शचा रॅप ऐकून बिग बी प्रभावित झाले होते.

जगभरातील प्रसिद्ध रॅपर होण्याचं स्पर्शचं स्वप्न आहे. त्याला कोट्यवधी लोकांसमोर परफॉर्म करायचं आहे. स्पर्शच्या आयुष्यावर आधारित 2018 मध्ये ‘ब्रिटल बोन रॅपर’ नावाने माहितीपट प्रदर्शित झाला होता.

१२ वर्षांचा असताना स्पर्शने सुप्रसिद्ध अमेरिकन रॅपर एमिनेमच्या ‘नॉट अफ्रेड’ या गाण्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून त्याला साडेसहा कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. या व्हिडीओची दखल नंतर एमिनेमच्या रेकॉर्ड लेबलनेही घेतली व त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर तो पोस्ट केला.

Story img Loader