अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया यांनी साऱ्या जगाला आपल्यामध्ये सारे काही अलबेल आहे असं दाखवायचा लाख प्रयत्न केला तरी या नवरा बायकोंमधली छोटी छोटी भांडणं काही लपून राहिली नाहीत. खुद्द मेलानियाने आपल्या छोट्या छोट्या कृतीतून हे जगाला दाखवून दिलंय. त्यामुळे त्यांच्यामधले हे ‘तू तू मै मै’चं भांडण कॅमेरात कैद झालं नाही तर नवल. इस्रायलच्या तेल अव्हिवमधील विमानतळावर ट्रम्प यांनी मेलानियाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण मेलानियाने माध्यमांसमोरच त्यांचा हात झटकून लावला. आता या गोष्टीला दिवसही उलटत नाही तोच आणखी एक प्रकार समोर आलाय.
ट्रम्प आणि मेलानिया दोघंही रोममध्ये पोहोचले, आता त्यांच्या स्वागतासाठी माध्यमांसह सगळेच उपस्थित होते. विमानाचे द्वार उघडताच या दाम्पत्यांने बाहेर येत हात हलवून सगळ्यांना अभिवादन केले, जेव्हा ते दोघंही विमानातून खाली उतरत होते तेव्हा दोघांमधला वाद काही लपून राहिला नाही. मेलानियाला खाली उतरण्यासाठी ट्रम्प यांनी आपला हात दिला. पण आपण त्यांच्याकडे पाहिलंच नाही अशा अविर्भावात मेलानियाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आता बिचाऱ्या पत्नीमुळे पुन्हा एकदा तोंडघशी पडण्याची वेळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आली. पण या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा नको म्हणत ट्रम्प यांनी हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. पण खूपच उशीर झाला होता यावेळीही हा प्रकार माध्यमांच्या नजरेतून काही सुटला नाही.