लॉकडाउनमुळे अनेक सार्वजनिक सेवा बंद आहेत. तरी भारतातील अनेक ठिकाणी आता होम डिलेव्हरी सुरु झाली असून मागील अनेक आठवड्यांपासून चटपटीत खाण्याची वाट पाहणाऱ्यांनी आता घरीच हॉटेलचे जेवण मागवून घरच्या खाण्यापासून थोडा ब्रेक घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला अशीच चटपटीत आणि हॉटेलमधलं जेवण खाण्याची इच्छा झाली. मात्र त्यासाठी बाहेर पडणं या व्यक्तीला जास्तच महागात पडलं आहे. यासंदर्भातील वृत्त ‘७ न्यूज’ या ऑस्ट्रेलियन वेबसाईटने दिलं आहे. बटर चिकन विकत आणण्यासाठी ३२ किमी प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ हजार ६५२ डॉलर इतका म्हणजेच १ लाख २३ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार करोनाचे वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतामध्ये लॉकडाउन जारी करण्यात आला आहे. मात्र याच कालावधीमध्ये बटर चिकन खाण्यासाठी मेलबर्नमधील सीबीडी येथून ३२ किमी दूर असणाऱ्या वेर्बिए शहरातून एक व्यक्तीने मेलबर्न शहरात दाखल झाला. मात्र शहरात प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांनी त्याला नियम तोडल्याप्रकरणी हटकले आणि योग्य कारण न सांगता आल्यामुळे त्याच्याकडून १ हजार ६५२ डॉलरचा दंड आकारला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीचे नाव निओल एटकिन्सन असे असून तो ४८ वर्षांचा आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या निओलने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या परिसरातील सर्व हॉटेल लॉकडाउनमुळे बंद असल्याने त्याने ३२ किमीवर असणाऱ्या मेलबर्नपर्यंत प्रवास केला. “मी जिथे राहतो त्या परिसरातील सर्व हॉटेल बंद होती. मला बटर चिकन खाण्याची खूप इच्छा झाली होती. माझी आई पंजाबमधील अंबाला येथील असल्याने भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतच मी मोठा झलो आहे,” असं निओल सांगतो.

निओल एटकिन्सन (फोटो सौजन्य: टाइम्स ऑफ इंडिया)

निओलला झालेल्या दंडाची बातमी समोर आल्यानंतर आता मेलबर्नमधील देसी ढाबा या हॉटेलने त्याला एक वर्ष मोफत खाणं देण्याची भन्नाट भेट दिली आहे. त्यामुळे सध्या दंड भरला असला तरी निओलच्या वर्षभराच्या खाण्याची सोय मात्र झाली आहे असंच म्हणता येईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Melbourne man travels 32 kms for the perfect butter chicken fined for violating lockdown scsg