पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅसच्या किमतीच्या दरवाढीबरोबर आता खाद्यपदार्थांच्या किमतींनी देखील उच्चांक गाठला आहे. लिंबूचे भाव असे वाढताहेत की लोकांचे बजेट आणि दात दोन्हीही आबंट झाल्याचे पाहायला मिळत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबाचा सर्वाधिक वापर केला जातो. मात्र आता लिंबूच्या भावामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबाचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यावेळी लिंबाच्या दरात जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाजारात तसेच दुकानात सध्या अनेक ठिकाणी एक लिंबू १० रूपयाला मिळतो. लक्षणीय बाब म्हणजे लिंबाचा भाव गगनाला भिडला असतानाच सोशल मीडियावर लिंबांच्या या वाढलेल्या किंमतीवर काही मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तुम्हाला आपलं हसू आवरता येणार नाही.

ट्विटरवर #LemonPrice, #Nimbu Twitter वर टॉप ट्रेंडिंग आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून लोक लिंबूच्या किमतीवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांनी सोनाराच्या दुकानात लिंबाचे छोटे तुकडे मिळतील असे काहींचे म्हणणे आहे. तर एका युजर्सने म्हटले की, “पूर्वी आपण लिंबू पिळत होतो आता लिंबूच आपल्याला पिळतोय. ” चला तर पाहूया सोशल मीडियावर कसा चाललाय लिंबाचा भाव.

लिंबू महागल्याचा परिणाम

उन्हाचा तडाका, वातावरण बदल आणि धुक्यामुळे यावर्षी झाडांची फुले गळून पडली. मागणीच्या तुलनेत लिंबांची आवक कमी होत असल्याने दर तेजीत आहेत. सुरुवातीला लिंबाचा १५ ते २० किलोच्या डागाला १५०० ते २००० रुपये इतका भाव मिळवायचा. आता हाच भाव ३००० रुपयांच्या आसपास पोहोचला असून ५०० ते १००० रुपयांची वाढ झाली आहे.

त्याच बरोबर उन्हाळ्यात ऑफिसला जाणारे किंवा रोजंदारीवर काम करणारी लोकं सहसा लिंबू सरबत पितात. मात्र लिंबाच्या दरात वाढ झाल्याने लिंबू सरबतच्या दरातही वाढ झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी लिंबू सरबतच्या गाड्या लावणाऱ्यांनी १० रुपयांऐवजी १५ रुपयांना १ ग्लास केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memes go viral on social media due to rising lemon prices scsm