विद्यार्थिनींना मासिक पाळी आल्यानंतर सुट्टी देण्याचा निर्णय मध्य प्रदेशातल्या विधी विद्यापीठाने घेतला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारं हे देशातलं पहिलं विद्यापीठ ठरलं आहे. मध्यप्रदेशातील जबलपूरच्या धर्मशास्त्र नॅशनल लॉ युनव्हर्सिटीने (DNLU) विद्यार्थिनींना मासिक पाळीची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने नव्या सत्रापासून मासिक पाळीच्या रजेचा आदेश जारी केला आहे.
मासिक पाळी असताना विद्यार्थिनींना मिळणार सुट्टी
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु शैलेश एन हादली यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टुडंट बार असोसिएशनच्या वतीने मासिक पाळीची सुट्टी देण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. हे लक्षात घेऊन आम्ही ही सुट्टी मंजूर केली आहे. नव्या सेमिस्टरपासून या रजा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुट्ट्या प्रत्येक सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी देण्यात येणाऱ्या सहा सुट्ट्यांचा एक भाग असतील. तसंच मुलींना मासिक पाळीच्या काळात या सुट्ट्या घेता येतील.
DNLU चे प्राध्यापक डॉ. प्रवीण त्रिपाठी यांनी माध्यमांना हेदेखील सांगितलं की मासिक पाळीच्या सुट्टीमुळे विद्यार्थिनींच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यास मदत होईल. तसंच मासिक पाळीविषयी असणारे सामाजिक गैरसमजही दूर होतील. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
काही महिन्यांपूर्वी स्पेन देशाच्या संसदेने मासिक पाळीदरम्यान रजेबाबत मोठा निर्णय घेतला होता. मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होत असलेल्या महिलांना सशुल्क वैद्यकीय रजा देण्याच्या कायद्याला संसदेने गुरुवारी मंजुरी दिली होती. असा कायदा करणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला होता. स्पेन हा युरोपियन युनियनमधील चौथा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.