अंजू ही भारतीय महिला राजस्थानातून पाकिस्तानात पोहचली आहे. अंजूने प्रियकरासाठी देश सोडल्याची बातमी चांगलीच व्हायरल झाली आहे. अशात तिच्या पतीची या प्रकरणी प्रतिक्रिया समोर आली. जयपूरला जाते आहे मला अंजूने सांगितलं होतं आणि ती पाकिस्तानात गेली असं त्याने म्हटलं आहे. आता अंजूच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझी मुलगी अंजू मानसिक दृष्ट्या स्थिर नाही आणि ती विक्षिप्त आहे असं आता तिच्या वडिलांनी म्हटलं आहे.
अंजूचे वडील थॉमस यांनी नेमकं काय वक्तव्य केलं?
“अंजू जयपूरला जाते हे सांगून पाकिस्तानला गेली हे मला सोमवारी कळलं आहे. माझा मुलगा डेव्हिडने मला सांगितलं की दीदी (अंजू) पाकिस्तानला गेली. मला याबाबत काही माहिती नाही. तिचं लग्न झाल्यापासून म्हणजेच मागच्या २० वर्षांपासून आमचा फारसा संपर्क नाही. लग्नानंतर ती भिवाडी या ठिकाणी पतीसह राहते आहे. तर मी मध्य प्रदेशातल्या गावात वास्तव्य करतो. एवढंच नाही तर अंजूचं मानसिक आरोग्य फारसं ताळ्यावर नसतं आणि ती विक्षिप्त आहे.” असंही गया प्रसाद थॉमस यांनी सांगितलं. इंडिया टुडेने याविषयीचं वृत्त केलं आहे.
माझा जावई अरविंद हा एकदम साधा माणूस आहे. अंजू मात्र विक्षिप्त आहे. तिचं तिच्या मित्राशी अफेअर वगैरे असेल असंही मला वाटत नाही. ती फक्त विक्षिप्तपणातून किंवा डोक्यात एक सणक आली म्हणून त्याला भेटायला गेली असेल एवढं मी खात्रीने सांगू शकतो असंही थॉमस यांनी सांगितलं आहे. मी तिच्या विक्षिप्त स्वभावामुळेच तिच्याशी फारसा संपर्कात नसतो असंही अंजूच्या वडिलांनी सांगितलं.
काय आहे हे प्रकरण?
अंजू नावाची एक भारतीय महिला पाकिस्तानात पोहचली आहे. आपण आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानात आल्याचं तिने म्हटलं आहे. प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण ताजं असतानाच ही नवी घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिवडीमधली विवाहिता अंजू ही थेत पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रियकराला भेटण्यासाठी गेली आहे. तिच्या पतीला आणि मुलांना सोडून तिने पाकिस्तान गाठलं. ज्यानंतर तिच्या पतीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
हे पण वाचा- सीमा, अंजू… अशी कोणती परिस्थिती परदेशातील प्रियकराकडे नेते ? काय असू शकतात कारणे…
काय म्हटलं आहे अंजूच्या पतीने?
चार दिवसांपूर्वी अंजू मला म्हणाली की मी फिरायला जाते आहे. मी तिला विचारलं कुठे जाते आहेस? तर ती म्हणाली जयपूरला. काही दिवसात परत येईन असंही तिने सांगितलं होतं. मात्र आता ती पाकिस्तानात गेल्याचं कळतं आहे. तिने माझ्याशी What’s App कॉलवरुन संपर्क केला होता. तेव्हा तिने मला सांगितलं की मी पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये आहे. दोन ते तीन दिवसांमध्ये मी परत येईन. असं सांगितलं मात्र आता ती पाकिस्तानात असल्याचं मला तुमच्याकडून कळतं आहे असं अंजूच्या पतीने ANI ला ही प्रतिक्रिया दिली आहे.
“अंजूला गोव्याला जायचं होतं पण ती पाकिस्तानात…”, भाऊ डेव्हिडने नेमकं काय सांगितलं?
पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी काय म्हटलं आहे?
अंजू नावाची महिला पाकिस्तानला गेल्याचं आम्हाला मीडियात आलेल्या बातम्यांद्वारेच आम्हाला कळलं. पाकिस्तानात ती तिच्या प्रियकराकडे गेली आहे. तो मुलगा फेसबुक, व्हॉट्स अॅप कॉलिंग या माध्यमातून तिच्या संपर्कात आला होता. गुरुवारी मी फिरायला जाते आहे असं तिने तिचा पती अरविंदला सांगितलं. अरविंद आणि अंजू हे दोघंही २००७ पासून भिवाडी या ठिकाणी राहतात. मात्र २१ जुलैला ती पाकिस्तानात गेली आहे ही माहिती आमच्याकडे आहे. २०२० मध्ये अंजूने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. ती पाकिस्तानात कशी गेली ते आम्हाला समजू शकलेलं नाही. असं ASP सुजीत शंकर यांनी ANI ला सांगितलं आहे. अद्याप याबाबत आम्हाला कुठलीही तक्रार मिळालेली नाही. आम्ही आमच्या पद्धतीने तपास करत आहोत असंही शंकर यांनी सांगितलं.