काही महिन्यांपूर्वी यूट्यूबर आनंद आदर्शचं एक गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. कर्ज या चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. या गाण्याचं रीमिक्स करून आनंद आदर्शनं ‘मेरी उमर के बेरोजगारो’ हे गाणं तयार केलं होतं. या वर्षी मार्च महिन्यात आलेल्या या गाण्यातं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा हे गाणं व्हायरल होऊ लागलं आहे. पण यंदा आनंद आदर्शच्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत नसून काही मुलांनी केलेला दुसरा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
काय आहे हे गाणं?
आनंद आदर्शनं या गाण्याचं रीमिक्स करून बेरोजगारीच्या समस्येवरून गाण्याचे शब्द फिरवले होते. ‘मेरी उमर के बेरोजगारो, जाति-धरम के चष्मे उतारो’ असे या गाण्याचे शब्द होते. या गाण्याचा व्हिडीओ युथ काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरही शेअर केला होता. केंद्र सरकारला या गाण्यातून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवरून प्रश्न विचारण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा एकदा हे गाणं व्हायरल होत आहे.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेअर केला व्हिडीओ
दरम्यान, आता दुसऱ्यांदा हे गाणं काही युवकांनी चित्रीत केल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असून काँग्रेसचे अनेक पदाधिकारी हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडीओमध्ये उपस्थित करण्यात आलेले बेरोजगारी, कमिशन राज, भ्रष्टाचार, तरुणांचा त्रागा या गोष्टी विरोधकांकडून व्हिडीओ शेअर करताना उपस्थित केल्या जात आहेत.
“तुमने कभी कोई फॉर्म फिल किया? रेल्वेको चार्ज एक्स्ट्रा दिया? मैने भी दिया…मेरी उमर के बेरोजगारो, जाति-धरम के चष्मे उतारो.. देखो ये कमिशन, दे रहे है हम को टेन्शन.. यूपी ट्रिपल एससी या हो एसएससी-रेलवे.. हर कोई खेलता है, छात्रों से खेलवे.. लेते नहीं है एक्झाम यूँही बरबाद साल करते.. और दे चुके है एक्झाम यहाँ वो बिन रिझल्ट तरसे” अशा शब्दांत युवकांच्या समस्या या गाण्याच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत.