देशभरात ख्रिसमसचा उत्साह मोठा पाहायला मिळतोय. अनेक चर्च, घरं आणि कामाच्या ठिकाणी ख्रिसमस सेलिब्रेशनचा आनंद घेतला जात आहे. दरम्यान, दिल्लीतील भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेदेखील ख्रिसमस डेनिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यात भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी कार्यक्रमात सहभाग घेत ख्रिसमस कॅरोल गायलं. सरन्यायाधीशांचा हा अनोखा अंदाज पाहून उपस्थितांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी ख्रिसमिसनिमित्त गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ ANI वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे. ज्यात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासह अनेक न्यायाधीश, वकील एकाचवेळी स्टेजवर उभे राहून टाळ्या वाजवत ख्रिसमस कॅरोल्स गाण्याचा आनंद घेताना दिसले. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी हातात माईक घेऊन गाण्यास सुरुवात केल्यानंतर इतरांनी त्यांना साथ दिली.
यावेळी त्यांनी लोकप्रिय “रुडॉल्फ द रेड-नोस्ड रेनडिअर” ते क्लासिक “जिंगल बेल्स, जिंगल बेल्स जिंगल ऑल द वे” हे कॅरोलदेखील गायले. दरम्यान, सरन्यायाधीशांचा हा अनोखा अंदाज आता अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या कार्यक्रमात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सशस्त्र दलांच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या भारतीय लष्करांच्या जवानांना श्रद्धांजलीदेखील वाहिली.