Cyclone Michaung Viral Video : सध्या दक्षिण भारतातील तामिळनाडू, चेन्नई, आंध्रप्रदेशमध्ये मिन्चॉग चक्रीवादळाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं. अनेक भागांत निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नागरिक जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. या ठिकाणच्या भयानक परिस्थितीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, याच परिस्थितीमधून एक मजेशीर व्हिडीओ सध्या समोर येत आहे, जो चेन्नईतील असल्याचा दावा केला जात आहे.
चेन्नईत पुरामुळे अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. लोक या पाण्यातून आपली वाट काढत जात आहेत. पण, मुसळधार पावसातही एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध एक जिवंत मासा पकडताना दिसत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीतील एका व्यक्तीने मासा पकडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ आपल्या मोबाइलच्या कॅमेरात कैद केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. पुराच्या जोरदार पाण्यात हा मासा वाहत रस्त्यावर आला आहे, असे पाहताना वाटते.
अरे ही तर ‘सबवे सर्फर गेम’मधील व्यक्ती! चक्क चालत्या ट्रेनवर लागली धावू; Video झाला व्हायरल
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरपावसात रस्त्यावर काळ्या रंगाच्या रोनकोटमध्ये एक व्यक्ती हातात मोठा मासा पकडून चालत आहे. पण, याचदरम्यान त्याच्या हातातून मासा निसटून रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात पडतो. यावेळी ती व्यक्ती खाली पडलेला मासा पकडण्याचा प्रयत्न करते, परंतु तो जिवंत मासा तडफडत असल्याने व्यक्तीला तो पकडण्यात अपयश येतं. अशात पुन्हा एकदा त्याच्या हातून मासा खाली पडतो, यामुळे व्यक्ती खूप वैतागते. शेवटी तो माश्याला पकडतो आणि तिथून निघून जातो. पुराच्या पाण्यातील मासा पकडण्यासाठी व्यक्तीची धडपड पाहून युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
चेन्नईतील या व्हिडीओवर युजर्स आता मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. अनेकांनी परिस्थिती काय आणि हा व्यक्ती वागतोय काय, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.