‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी बंगळुरूमधील इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या शाखा पोस्टमास्तर कुसुमा के. यांचे कौतुक केले आहे. गेट्स यांनी आपल्या लिंक्डइन अकाउंटवर कुसुमा यांच्याबद्दल एक भलीमोठी कौतुकास्पद पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी भारताच्या डिजिटलायझेशनबाबतही गौरवोदगार काढले आहेत. त्यामुळे बिल गेट्स यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
बिल गेट्स यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेय की, मला भारतातील प्रवासादरम्यान बदल घडवून आणणारी कुसुमा ही एक अतुलनीय शक्ती भेटली; जी स्थानिक टपाल विभागात उल्लेखनीय काम करणारी एक हुशार तरुणी आहे.
सर्वसमावेशक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात भारत अग्रेसर आहे. कुसुमा यांच्यासारख्या शाखा पोस्टमास्तर संपूर्ण भारतातील ग्राहकांना बँकिंग सेवा देण्यासाठी स्मार्टफोन उपकरणे आणि बायोमेट्रिक्स वापरण्यास सक्षम करीत आहेत. ती केवळ एकात्मिक आर्थिक सेवाच प्रदान करीत नाही, तर ती तिच्या समुदायाला आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत करीत आहे.
बिल गेट्स यांनी त्यांच्या gatesfoundation वेबसाईटवरही कुसुमाच्या कामाचे आणि भारतातील डिजिटल बँकिंग प्रगतीचे कौतुक करणारी पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केला आहे. भारतातील डिजिटल बँकिंगची कथा आणि आणि एका तरुणीच्या करिअरचा आशादायक मार्ग या मथळ्याखाली त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलेय की, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ७० दशलक्ष लोकांना रोख पैसे काढणे आणि ठेवी, रेमिटन्स व युटिलिटी पेमेंट यांसारख्या डिजिटल बँकिंग सेवा देते. देश आपली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात अग्रेसर आहे; ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्र आणि व्यवसाय देशातील कोठूनही उपलब्ध असलेल्या सुरक्षित व तत्काळ पेपरलेस आणि कॅशलेस सेवांची श्रेणी देऊ शकतात. त्यामुळे लोकांना त्यांच्या दैनंदिन वेतनावर अवलंबून न राहता, डिजिटल बँकिंगमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते आणि कालांतराने त्यांची बचत वाढवते.
या व्हिडीओमध्ये बंगळुरूमधील शाखा पोस्टमास्तर कुसुमा के. यांचा समुदायावर डिजिटल बँकिंगचा प्रभाव आणि ही यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल अभिमान असल्याचे म्हटले आहे. याशिवाय भारतातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे.