Alcohol Coming Out Of Water Pump: उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर दारू माफियांनी कायद्याच्या चौकटीतुन मोकळे राहण्यासाठी, एक कुणीही विचार न केलेला मार्ग अवलंबल्याचे समजतेय. झाशीच्या परगणा गावातील कबुत्र डेरामधील हात पंपातून पाण्याऐवजी चक्क दारू बाहेर येत असल्याचा प्रकार अलीकडेच उघडकीस आला. या परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या विचित्र योजनेचा पर्दाफाश केला.
कबुत्र डेरा येथे अवैध दारू बनत असल्याच्या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांचे पथक छापा टाकण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी दोन घरातून तसेच शेतातून दारू शोधून काढली. पोलिसांनी पाणी पिण्यासाठी जवळचा हातपंप गाठला असता त्यांना यावेळी शेतात अनेक हातपंप दिसले, साहजिकच इतके हातपंप पाहून पोलिसांना संशय आला. साधारणतः शेताला पाणी देण्यासाठी इतक्या प्रमाणात हातपंपाची आवश्यकता नसल्याने हा नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार असणारे हे पोलिसांना जाणवले.
जेव्हा अधिकाऱ्यांनी हा पाण्याचा पंप म्हणजेच हापशी हापासून पाहिली तर यावेळी पाण्याच्या ऐवजी यातून चक्क दारू बाहेर येऊ लागली. यानंतर लगेचच पोलिसांनी या ठिकाणी खणायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आले की हे हातपंप केवळ दाखवण्यासाठी लावलेले होते व त्यांच्या खाली खड्डा खणून चक्क दारूने भरलेले ड्रम ठेवलेले होते.
उत्पादन शुल्क निरीक्षक अशोक राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत ५०० लीटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच आंबवण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणणाऱ्या पदार्थाचा तीन हजार किलोचा साठा देखील नष्ट करण्यात आला आहे. या अवैध उद्योगात सहभागी असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये ‘बॅटमॅन’ सज्ज! ‘या’ वेळी तिकीट न काढता जाण्याची चूक अजिबात करू नका, काय आहे नवा बदल?
दरम्यान अशा प्रकारचा गुप्त अवैध व्यवसाय करण्याची ही पहिलीच वेळ नाही गेल्या वर्षी झाशीच्या बेसरिया डेरा गावात दारू वितरीत करणाऱ्या हातपंपाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि पोलिसांनी या प्रकरणी अनेकांना अटक केली होती. वर्षभराने असेच एक नवे प्रकरण समोर आले आहे.