Miss Universe Winner Final Round Answers: यूएसएच्या आर’बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) हिने ७१ व्या मिस युनिव्हर्स पेजेंटचे विजेतेपद पटकवले आहे. गॅब्रिएलच्या रूपात जगाला नवी मिस युनिव्हर्स मिळाली आहे. १५ जानेवारीला न्यू ऑर्लिन्स येथे पार पडलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात यंदाचा मिस युनिव्हर्स किताब जाहीर करण्यात आला. भारताच्या हरनाझ कौर सिंधू हिने नव्या मिस युनिव्हर्सला मानाचा मुकुट देऊन गौरवले. भारतीय दिविता रायने टॉप १६ मध्ये स्थान मिळवले.गॅब्रिएलच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या प्रश्न उत्तरांच्या फेरीतील व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत परीक्षकांनी गॅब्रिएलला दोन प्रश्न केले यातील पहिला प्रश्न होता की मिस युनिव्हर्सने नुकताच सर्वसमावेशक बदल केला आहे ज्यामुळे माता आणि विवाहित महिलांना या वर्षी स्पर्धा करता येईल. तुम्हाला आणखी कोणता बदल पाहायला आवडेल आणि का?
यावर उत्तर देताना ती म्हणाली, “मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी मला वयाची मर्यादा वाढलेली पाहायला आवडेल कारण मी स्वतः २८ वर्षांची आहे आणि स्पर्धा करण्यासाठी हे सर्वात मोठे वय आहे. मला वाटते की ही एक सुंदर गोष्ट आहे. माझे आवडतं वाक्य म्हणजे ‘आता नाही तर कधी?’ एक स्त्री म्हणून मला विश्वास वाटतो की वय हे आपली क्षमता दर्शवत नाही. तुमची वेळ उद्या नाही, काल कदाचित नव्हती पण आता आहे. आता वेळ आली आहे की तुम्ही तुम्हाला हवे ते करू शकता.”
गॅब्रिएलला विचारण्यात आलेला दुसरा प्रश्न होता, “जर तुम्ही मिस युनिव्हर्स जिंकलात, तर ही एक सक्षम आणि प्रगतीशील संस्था आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही कसे कार्य कराल? गॅब्रिएल एक पर्यावरणपूरक फॅशन डिझायनर, मॉडेल आणि फॅशन डिझाईनिंग प्रशिक्षक देखील आहे. तिच्या उत्तरावरून तिचे तिच्या कामाबद्दलचे प्रेम दिसून आले.
गॅब्रिएलचे उत्तर- “ मी या संधीचा उपयोग परिवर्तनासाठी करेन. मी १३ वर्षांपासून फॅशन क्षेत्रात काम करत आहे, मी फॅशनचा उपयोग शक्ती म्हणून करते. माझ्या उद्योगात, मी माझे कपडे बनवताना पुनर्वापर करून प्रदूषण कमी करत आहे. मानवी तस्करी आणि घरगुती हिंसाचारापासून वाचलेल्या महिलांना मी शिवणकामाचे वर्ग शिकवते. इतरांमध्ये गुंतवणूक करणे, आपल्या समाजात गुंतवणूक करणे आणि यासाठी आपल्या टॅलेंटचा वापर करणे खूप महत्वाचे आहे.
हे ही वाचा<< Video: मिस युनिव्हर्स ठरली आर’बोनी गॅब्रिएल; भारताच्या दिवीताला.. पाहा अंतिम फेरीतील ‘तो’ विजयी क्षण
दरम्यान या स्पर्धेत व्हेनेझुएलाची अमांडा डुडामेल ही पहिली उपविजेती ठरली, तर डॉमिनिकन रिपब्लिकची आंद्रेना मार्टिनेझ या स्पर्धेची दुसरी उपविजेती ठरली. यंदा भारताचे प्रतिनिधित्व कर्नाटकच्या दिविता राय हिने केले. ८० हून अधिक स्पर्धकांनी मिस युनिव्हर्स २०२२ च्या विजेतेपदासाठी स्पर्धेत सहभाग घेतला होता. भारताच्या दिविताने टॉप १६ मध्ये स्थान मिळवले.