राज्यामध्ये मागील काही आठवड्यांपासून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अगदी एकमेकांच्या व्यवसायांपासून ते आई, वडिलांपर्यंतची वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून केली जात आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज्यातील राजकीय वातावरण बंडखोरी आणि त्यानंतरच्या घडामोडींने ढवळून निघालेलं असतानाच दुसरीकडे गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या नातवासोबत चक्क शिवाजी पार्क मैदानाच्या कठड्यावर निवांत बसलेले पाहायला मिळाले.
नक्की वाचा >> “आमचे चुलत भाऊ राज दादा एवढ्या सगळ्या मिमिक्र्या…”; थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा शिंदे सरकारला टोला
काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज यांनी घेतला होता. तसेच अमित ठाकरेही राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करत असून पक्षबांधणीच्या कामात व्यस्त आहेत. आपल्या या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून राज यांनी आजोबांची भूमिका पार पाडल्याचं चित्र मुंबईकरांना बुधवारी पहायला मिळालं.
राज हे त्यांचा नातू किआनबरोबर शिवाजी पार्कच्या कठड्यावर बराच वेळ बसून होते. राज यांची सून मिताली तसेच पत्नी म्हणजेच बाळाच्या आजी शर्मिला ठाकरेही या दोघांबरोबर होत्या. किआनला पाहण्यासाठी अनेकांनी राज यांच्याभोवती गर्दी केली. अनेकांनी ठाकरे कुटुंबासोबत सेल्फीही काढले. काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले. हे निवासस्थानही पूर्वीच्या निवासस्थानाप्रमाणे शिवाजी पार्कपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
याच वर्षी पाच एप्रिल रोजी अमित ठाकरे आणि मिताली यांना पुत्ररत्नप्राप्ती झाली. नातू झाल्याची बातमी समजल्यानंतर राज ठाकरे ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये नातवाला पाहण्यासाठी गेल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला. अमित यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.