महाराष्ट्रातील राजकीय वातारवण मागील काही दिवसांपासून ढवळून निघालेलं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे मात्र मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कामासंदर्भात कोकण दौऱ्यावर आहेत. याच कोकण दौऱ्यामध्ये त्यांनी नुकताच एक ट्रेक केला. या ट्रेकचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतानाच आता अमित यांनीच काही फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी कोकणचा निसर्ग आपण जिवापाड जपला पाहिजे असं मत व्यक्त केलंय.
नक्की पाहा >> Photos: धबधबे, हिरवळ, ओढे अन्… स्पेशल व्यक्तीसोबत अमित ठाकरेंचं आंबोलीत ट्रेकिंग; कोकणचा निसर्ग पाहून म्हणाले, “मी इथे…”
“काल सावंतवाडी इथल्या संवाद बैठका संपल्यानंतर सहकाऱ्यांसह आंबोली घाटातल्या चौकुळ कुंभवडे गावाच्या परिसरात गेलो होतो. कोकणचा ‘रानमाणूस’ प्रसाद गावडे यांच्यासोबत भटकंती केली,” असं अमित यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. पुढे बोलताना त्यांनी, “इको-टुरीझमचे महत्त्व जाणून घेतले. सह्याद्रीतील अनेक नद्यांचे उगमस्थान असलेल्या या निसर्गरम्य परिसरात पायवाटेवर अनेक धबधबे पाहिले. बायो-डायव्हर्सिटीने संपन्न असा हा सावंतवाडी, दोडामार्ग इथला वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आपण सर्वांनी जीवापाड जपायला हवा,” असंही म्हटलंय.
पोस्टच्या शेवटी त्यांनी, “कोकणासारखं निसर्ग सौंदर्य परदेशात आपल्याला क्वचितच अनुभवायला मिळतं. कोकणातल्या निसर्गाचं मोल आपण ओळखायला हवं,” असंही आवाहन केलं आहे. निसर्ग संवर्धनाची गरज आपण सर्वांनी ओळखायला हवी असं अमित ठाकरेंना सूचित केलं आहे.
रानमाणूस म्हणून लोकप्रिय असणारे पर्यावरणस्नेही पर्यटनाचे पुरस्कर्ते प्रसाद गावडे यांनी अमित यांना या ट्रेकमध्ये मार्गदर्शन केलं. गावडे यांच्या रुपाने अमित ठाकरेंना खऱ्या अर्थाने एक खास व्यक्ती या ट्रेकमध्ये वाटाड्याच्या रुपात सोबत होती. “महाराष्ट्रातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना होस्ट करण्याची संधी आज मिळाली,” असं म्हणत गावडे यांनी या ट्रेकचे काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
सह्याद्रीतील निसर्ग भ्रमंती करताना हा पर्यावरण संवेदनशील भाग शाश्वत जीवन शैलीवर आधारित पर्यटनातून कसा विकसित करता येईल या विषयावर आपल्याला अमित ठाकरेंसमोर विचार व्यक्त करता आल्याबद्दल गावडे यांनी समाधान व्यक्त केलंय.
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी आजची, मंगळवारची (५ जुलै २०२२ रोजीची) दुपार खूपच हटके होती,” असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी या ट्रेकसंदर्भातील माहिती एका पोस्टमधून दिलीय. “निसर्गरम्य परिसर, सगळीकडे दाटलेलं धुकं, त्यात अधूनमधून जोरात कोसळणारा पाऊस, खळाळती नदी आणि केगदवाडीतून दर काही मीटर अंतरावर कोसळणारे कुंभवडे गावचे धबधबे,” असा हा सारा ट्रेक झाल्याचं शिंदे पोस्टमध्ये सांगतात.
“अमित ठाकरेंनी रानमाणसाला (प्रसाद गावडे यांना) अगदी सहजपणे, “मी इथे कितीही वेळ काढू शकतो. मला पुन्हा पुन्हा इथे यायला आवडेल,” असं बोलून गेले,” असंही शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलंय.