काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळीच सांताक्रूझ येथे महापौरांनी एका महिलेचा हात पिरगळून तिला धमकी दिल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर फिरू लागली आहे. महापौरांनी या घटनेचा इन्कार केला असून हे कटकारस्थान असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनीदेखील याची दखल घेतली असून त्यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. तुम्हाला शेकहँड करायला तुमच्या भेटीला येतोय, असं नांदगावकरांनी महापौरांना म्हटलं आहे.
दरम्यान, महापौरांनी ज्याप्रकरचं कृत्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे नितीन नांदगावर म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील आठवण काढली. “बाळासाहेब ठाकरे हे जर आज असते तर त्यांनी तुमची त्याच क्षणी हकालपट्टी केली असती. परंतु या गोष्टी आता होत नसल्याचं दुर्देव आहे. मी तुमच्या भेटीला येणार असून तुमच्याशी शेकहँड करायचाय आणि त्यापुढे काय होतं हे पहायचं आहे,” असंही ते व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतायत.
“हा प्रकार घडत असताना कोणीही बोलण्याव्यतिरिक्त त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नसल्याचं वाईट वाटत आहे. माझा जो नियम इतरांना लागू होतो तोच महापौरांनाही लागू होतो. आज बाळासाहेब हवे होते. ते असते तर आज असे प्रकार अजिबात घडले नसते. तसेच ज्यावेळी तुम्हाला भेटायला येईन ते तुम्हाला सांगूनच येईन,” असंही ते व्हिडीओमध्ये म्हणाले.