फॅशनच्या दुनियेत तुमच्या कल्पकतेला कसलेही बंधन नसते. अनेक फॅशन शोमध्ये तुम्ही त्याची अनेक उदाहरणं पाहिली असतील. नुकतेच पॅरिस फॅशन विकदरम्यान एका मॉडेलने जिवंत फुलपाखरांसह फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केले होते. आता चेन्नईमध्ये झालेल्या एका फॅशन शोमध्ये एका भारतीय मॉडेलने चक्क जिवंत माशांसह स्टेजवर रॅम्प वॉक केले. तिने जलपरीचा ड्रेस परिधान केला होता आणि तिच्या ड्रेसमध्ये चक्क ‘फिशपॉट’ लावला आहे. या फिशपॉटमध्ये पाण्यात विविध रंगांंचे जिवंत मासे सोडण्यात आल्याचे दिसते आहे. सोशल मीडियावर या मॉडेलच्या अतरंगी ड्रेसचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जिवंत माशांसह जलपरी ड्रेसने वेधले सर्वांचं लक्ष
इन्स्टाग्रामवर ohsopretty_makeover आणि preethijerlin यांच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मॉडेलने विविध मोती, शंख शिंपल्यांसह तयार केलेला सुंदर जलपरी ड्रेस परिधान केलेला आहे. विशेष म्हणजे ड्रेसमध्येच एक फिशपॉट बसवण्यात आलेला आहे. त्या पॉटमध्ये पाणी आणि काही मासे सोडताना व्हिडीओमध्ये दिसते आहे. त्यानंतर मॉडेल कॅमेऱ्यासमोर तिच्या अदा दाखवत आहे. या आगळ्या वेगळ्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मॉडेलने चेन्नईमध्ये एका फॅशन शोमध्ये हा ड्रेस परिधान करून रॅम्प वॉकही केला.
हेही वाचा – जोडप्याने रेस्टॉरंटमध्ये दिली लग्नाची मोठी रिसेप्शन पार्टी! लाखों रुपयांचे बिल न भरताच नवरा-नवरीने काढला पळ
फॅशन शोसाठी जिवंत प्राण्यांचा वापर करणे ही कल्पना आणि त्यांना एक साधन असल्यासारखा वापर करण्यावर नेटकऱ्यांनी टिका केली आहे. प्राण्यांवर होणारा हा अत्याचार आणि या क्रुरते विरोधात आवाज उठवत नेटकऱ्यांनी याचा निषेध व्यक्त केला. अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने प्रतिक्रिया दिली की, “हे अत्यंत घृणास्पद आहे! फॅशनसाठी प्राण्यांचा वापर करणे थांबवा.” दुसरा म्हणाला, “तुम्हाला लोकांची अडचण काय आहे, या मुक्या प्राण्यांना त्रास देणे थांबवा.”
हेही वाचा – पाणीपुरीचे भजी! व्हायरल व्हिडीओ पाहून खाद्यप्रेमी संतापले, म्हणाले, “आतापर्यंतचा सर्वात वाईट प्रयोग…”
फॅशन म्हणून विचित्र कपडे डिझाईन करण्याचे जिवंत उदाहरण म्हणजे अभिनेत्री उर्फी जावेद. उर्फीने या ड्रेसवर प्रतिक्रिया दिली आहे. तिला ही कल्पना फार आवडली आहे.