काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना सोशल मीडियावर ट्रोल करता करता एकमेकांच्या प्रेमात आणि नंतर लग्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक जय दवे आणि त्याची पत्नी अल्पिका पांडे यांच्या नात्यात आता दुरावा निर्माण झाला आहे. छळ करण्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप अल्पिकाने जय दवे याच्यावर केला आहे. भाजपा आणि सोशल मीडियामध्ये स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी त्याने माझ्या परवानगीशिवाय माझ्याच छायाचित्रांचा वापर केल्याचा आरोपही तिने केला आहे. इतकंच नाही तर त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केल्याचं तिने म्हटलं आहे. गेल्या 31 डिसेंबर रोजी दोघं विवाहबंधनात अडकले होते.

काही दिवसांपूर्वी ‘लव्ह अॅट फेसबुक कमेंट’चं हे प्रकरण सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं होतं. गुजरातच्या जामनगरचा रहिवासी जय दवे याने त्याची कमेंट लाइक करणाऱ्या तरुणीशी लग्न केलं आणि त्याची जाहीर घोषणाही केली. आपल्या प्रेमकहाणी बाबत जयने ट्विट केलं आणि काही मिनिटांमध्येच ते सोशल मीडियावर ट्रेंड झाले होते.

काय होतं जय दवेचं पहिलं ट्विट-
‘मोदीजी आम्ही तुमच्यावरील प्रेमाखातरच एकमेकांशी लग्न केलं. मी राहुल गांधींच्या फेसबुक पेजवर तुमच्या समर्थनाची कमेंट केली आणि एका सुंदर मुलीने ती कमेंट लाइक केली. त्यानंतर आम्ही एकमेकांशी बोललो, भेटलो आणि आम्ही एकमेकांना योग्य सपोर्ट देऊ शकतो हे लक्षात आलं. देशासाठी दोघांनाही जगायचं आहे म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला’. या ट्विटनंतर जयचं अभिनंदन करण्यास सुरूवात झाली. तर काही जणांनी जयला ट्रोलही केलं होतं. यानंतर जयने त्याचं ट्विट डीलिट केलं. पण नंतर पुन्हा एकदा त्याने डीलिट केलेल्या ट्विटचा फोटो पोस्ट केला आणि मला दुसरं ट्विट डीलिट करायचं होतं पण चुकून हे डीलिट झालं असं स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर अजून एका ट्विटमध्ये त्याने, ‘माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये मी ट्रोल होण्याच्या भीतीतून ट्विट डीलिट केल्याचा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. पण खरं म्हणजे ट्रोलिंग आणि टीकेची मला सवय झाली आहे. देशासाठीचं माझं समर्पण ट्रोलिंगमुळे कमी होणार नाही, जय हिंद’, असं म्हटलं होतं.


काय आहेत अल्पिकाने केलेले आरोप –
लग्नाच्या अवघ्या एका महिन्यानंतर आता अल्पिका पांडेने ट्विटरद्वारेच जय दवेवर आरोप शिवीगाळ आणि छळ करण्याचे आरोप केले आहेत. ‘मी आता 18 वर्षांची आहे आणि तो 29 वर्षांचा पण त्याच्याकडे पाहून त्याचं वय जाणवत नाही. सर्वप्रथम त्याने माझ्या छायाचित्रांचा मला न सांगता स्वतःच्या प्रसीद्धीसाठी वापर केला. भाजपा आणि सोशल मीडियामध्ये स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी त्याने हे केलं. त्याने माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला. मला इतका जास्त त्रास देण्यात आला की आत्महत्येचाही प्रयत्न केला. त्याच्या कुटुंबियांनीही त्याची साथ दिली. सन्मान देण्याच्या नावाखाली मला घऱातून बाहेर पडण्याचीही परवानगी नव्हती. अनेकदा स्पष्टीकरण देऊनही त्यांना माझ्याबाबत संशय होता. मी बाथरुममध्ये काय करत होती हे देखील मला त्यांना सांगायला लागयचं. मी माझ्या फोनमध्ये काय करते हे सर्व त्याला सांगायला लागायचं अन्यथा माझा फोन हिसकावून घेतला जायचा. माझ्या वैयक्तिक जीवनाचा कधीच विचार केला नाही. त्याचं खरंच माझ्यावर प्रेम होतं की नाही याबाबत आता माझ्या मनात शंका आहे. असंच एखादा मोदी भक्त भक्तीच्या नावाखाली वागतो का ?’

Story img Loader