लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांचे फोटो पाहिले की हे नक्की काय लिहिलंय असं कुतूहल आपल्या सगळ्यांनाच वाटायचं. महाराजांनी लिहिलेलं पत्र म्हणून त्या पत्राकडे बघताना छाती दडपायची. शिवरायांच्या पत्रांची भाषांतरं सहज मिळत असली तरी मोडी लिपीतल्या त्या मूळ पत्राचं कायमच एक गूढ आकर्षण होतं. कितीही असलं तरी मोडी लिपी माहीत नसल्याने आपल्यापैकी बऱ्याच जणांची हे पत्र स्वत: वाचायची इच्छा अपूर्णच राहिली.
हळूहळू लोप पावत जाणाऱ्या मोडी लिपीबाबत सगळेच उसासे टाकतात. पण काहीजण आपल्या ज्ञानाचा वापर करत मोडी लिपी आधुनिक काळात टिकावी यासाठी आपलं कौशल्य पणाला लावतात. त्यातलाच एक आहे संतोष यादव
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला संतोष लहानपणापासूनच इतिहासवेडा होता. आपल्या इतिहासाच्या वेडाचं त्याने करिअरमध्ये रूपांतर करत अहमदनगरच्या म्युझियममध्ये क्युरेटरची नोकरी करणं सुरू केलं.
मोडी लिपीला मोठा इतिहास आहे. १३ व्या शतकापासून ते अगदी १९५० सालापर्यंत मोडी लिपीचा वापर होत होता. शिवाजी महाराजांच्या पत्रांसारखेच अनेक महत्त्वाचे दस्तएेवज मोडी लिपीत आहेत. ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं ते मोडी लिपीतच. मराठेशाहीतली अनेक कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. त्याकाळच्या भाषेचा डौलदारपणा, काहीसा राकट पण स्पष्ट बाज अनेक कागदपत्रांमधून समोर येतो.
१९५० साली मराठी भाषेची अधिकृत लिपी म्हणून देवनागरीला मान्यता मिळाली आणि मोडीचं महत्त्व आणि ज्ञान झपाट्याने कमी झालं.
३३ वर्षांच्या संतोष यादवने हीच परिस्थिती सुधारायचं ठरवलं आणि मोडी भाषेच्या डिजिटाझेशनचा विडा उचलला. याची पहिली पायरी म्हणून त्याने मोडी लिपीचा डिजिटल फाँट तयार करायचं ठरवलं. एमएस-सीआयटी केलेल्या संतोषला काँप्युटरची ओळक तर होतीच पण तो काम करत असलेल्या म्युझियममध्ये मोडीमधल्या कागदपत्रांचा खजिना होता. या सगळ्याचा वापर करत संतोषने डिजिटल फाँट तयार करायचं काम सुरू केलं. ५६ मुळाक्षरं असलेली मोडी लिपी इंग्लिश कीबोर्डचा वापर करत टाईप करणं कठीण बाब होती. पण वर्षभर मेहनत करत त्याने स्वत:चा असा ‘मोडी संतोष’ फाँट तयार केला….
आज संतोष मोडीच्या प्रसारासाठी झटतोय. नगरमधल्या एका काॅलेजमध्ये तो मोडी लिपीचे वर्गही घेतो. आपला फाँटसुध्दा त्याने कमी किंमतीत इतरांना द्यायला सुरूवात केलीये.
मराठीजनांचाच मराठी भाषेकडचा ओढा कमी होत असल्याचं दिसत असताना मायमराठीच्या या लहान बहिणीला जगवण्याचं काम संतोषसारखे तरूण करत आहेत. त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांना सलाम!