आम आदमी पार्टीचे राज्य सभेचे खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केलाय. सिंग यांनी मागील महिन्यामध्येच पंतप्रधान मोदी देशातील करोना परिस्थितीसंदर्भात बोलताना टीव्हीवर येऊन रडतील, असं म्हटलं होतं. शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदींचा कंठ दाटून आल्याचं पहायला मिळालं. मोदींना आलेला हा गहिवर सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम आदमी पार्टीने जारी केलेल्या अधिकृत पत्रकामध्ये संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केलेली शक्यता खरी ठरली आहे. राज्यसभेतील आपचे खासदार असणाऱ्या संजय यांनी १७ एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं भाकित २१ मे रोजी खरं ठरलं, असं आपने म्हटलं आहे.

१७ एप्रिल रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय यांनी, “अजून थोडा दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावूक झाले आणि रडू लागले यासंदर्भातील बातम्या चालवतील,” असं म्हटलं होतं.

याच मुलाखतीमधील काही भाग शेअर करत संजय यांनी मोदींवर शुक्रवारी ट्विटरवरुन निशाणा साधला. “जे १७ एप्रिलला बोललो होतो ते २१ मे ला खरं ठरलं. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाचा व्यक्ती हवाय. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नकोयत ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन करोनाचा प्रसार केला आणि आता रडण्याचं नाटक करत आहेत,” असा टोला संजय यांनी लगवाला आहे.

वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी शुक्रवारी संवाद साधला. त्यावेळी करोनामुळे मरण पावलेल्यांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आला. देशातील आणि वाराणसीमधील परिस्थितीबद्दल मोदी बोलत होते. याचवेळेस करोनामुळे आपल्या जवळच्या अनेक प्रिय व्यक्तींना प्राण गमावावा लागला आहे. करोनामुळे मरण पवालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मोदींना रडू आलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi would come on tv and cry about covid situation aap rajya sabha mp recalls his prediction scsg