Mohammad Shami Home: २०२३ च्या विश्वचषकादरम्यान भारताने संपूर्ण स्पर्धेत अफलातून कामगिरी दर्शवली, मात्र अगदी शेवटच्या टप्यात ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये सहा विकेट्सने पराभूत झाल्यामुळे शेवट मात्र भारतासाठी गोड झाला नाही. आयसीसीने विराट कोहलीना प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार दिला असला तरी आणखी एका खेळाडूने या पुरस्कारासाठी तगडी टक्कर दिली होती आणि तो म्हणजेच भारताचा वेगवान गोलंदाज, मोहम्मद शमी! पहिल्या चार सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नसतानाही शमी स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. अष्टपैलू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतरच शमीला संघात स्थान मिळाले आणि मग विश्वचषकात जे घडलं ते सर्वांनीच पाहिलं आहे.
शमीने विश्वचषकात वाट्याला आलेल्या खेळांमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. 5/54 (वि न्यूझीलंड), 4/22 (वि. इंग्लंड), 5/18 (वि श्रीलंका), 2/18 (वि दक्षिण आफ्रिका), 0/41 (वि नेदरलँड), 7/57 (वि न्यूझीलंड) आणि 1/47 (वि ऑस्ट्रेलिया) हे आकडे पाहूनच तुम्ही शमीच्या जबरदस्त खेळीचा अंदाज लावू शकता.
शमीच्या विश्वचषकातील कामगिरीमुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे. इतकं की, रविवारी त्याची एक झलक पाहण्यासाठी व त्याच्यासह फोटोसाठी त्याच्या घराबाहेर लोकांनी मोठी रांग लावली होती. शमीने स्वतः या जमावाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आपण पाहू शकता शमीच्या घराच्या दाराबाहेर लोकांची रांग दिसतेय. शमीचे सुरक्षारक्षक एक एक करून या रांगेतील व्यक्तींना आतमध्ये सोडत आहे. इतकी लोकप्रियता मिळूनही शमी आपल्या चाहत्यांसाठी सुद्धा वेळ काढतोय हे पाहून अनेकांनी कमेंटमध्ये त्याचे कौतुकही केले आहे.
Video: मोहम्मद शमीच्या घराबाहेर रांगा
हे ही वाचा<<“BCCI एवढे पैसे नसतील पण..”, IND vs SA सामना रद्द होताच गावसकर भडकले; म्हणाले, “पूर्णपणे खोटं..”
अलीकडेच एका अहवालात असे म्हटले आहे की शमीला घोट्याच्या वेदनांचा त्रास जाणवत आहे आहे, वर्ल्डकपच्या संपूर्ण मोहिमेदरम्यान सुद्धा गोलंदाजी करताना त्याला हा त्रास जाणवतच होता. दुसरीकडे विश्वचषकाच्या दरम्यान शमीची आई सुद्धा आजारी होती असे वृत्त होते. म्हणूनच विश्वचषकानंतर, शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या T20I मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.