अनेकदा तुम्ही लोकांना आजारी पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतांना किंवा त्यांच्याकडून उपचार घेताना पाहिलं असेलच. पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन उपचार घेताना पाहिलं आहे का? नाही ना. खरं तर असंच काहीसं सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हीडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एक जखमी माकड आपल्या मुलाला घेऊन क्लिनिकमध्ये उपचार घेण्यासाठी पोहोचलं. हे पाहून डॉक्टर आधी चकित झाले. मात्र , एक माणूस म्हणून त्यांनी जखमी माकडाला चांगले मलम लावले. काही काळ क्लिनिकमध्ये राहिल्यानंतर माकड तेथून निघून गेले. हा व्हीडीओ बिहारच्या रोहतासचा आहे. या प्रकरणाचा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माकड क्लिनिकमध्ये डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माकड क्लिनिकमध्ये बेंचवर बसलेलं दिसतंय. त्यानंतर त्याची समस्या लक्षात आल्यानंतर डॉक्टर त्याच्यावर पट्टी बांधतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माकडावर उपचार करणार्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सुरुवातीला ते माकडाला पाहून घाबरले. पण जेव्हा त्यांनी त्या माकडाचा आक्रोश ऐकला तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ जाऊन त्याची तपासणी केली. यानंतर, त्याच्या जखमांवर औषध लावून, त्याला क्लिनिकमध्ये थोडा वेळ आराम करू दिला. यानंतर व्हीडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, उपचारानंतर माकड काही वेळ बेंचवरच झोपले आहे.
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जखमी माकडाचा हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसंच हा व्हीडीओ पाहिल्यानंतर, मोठ्या संख्येने लोक यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. माकड ज्या संयमाने उपचार घेत होते ते पाहून डॉक्टरही हैराण झाले होते. आजूबाजूच्या लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी या माकडाची झलक पाहण्यासाठी तातडीने क्लिनिककडे धाव घेतली. यादरम्यान काही लोकांनी एक व्हीडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला, जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.