आजकाल क्लबमध्ये पार्टी करण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अनेकजण स्वत:चं मनोरंजन करण्यासाठी अशा क्लबमध्ये जात असतात. मात्र, मनोरंजनासाठी मुक्या प्राण्यांना त्रास देणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे, सध्या सोशल मीडियवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नाईट क्लबमध्ये एका माकडाला साखळदंडाने बांधलेले दिसत आहे. हा व्हिडिओ कोलकाता येथील एका नाईट क्लबमधील असल्याचे सांगितलं जात आहे. क्लबमध्ये पार्टी करण्यासाठी आलेले काही लोकदेखील या माकडासोबत दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, माकडाकला जबरदस्तीने केलेल्या नशेमुळे ते बेशुद्ध पडलेलं दिसत आहे. तर या माकडाला सर्कस थीम पार्टीसाठी नाईट क्लबमध्ये आणण्यात आलं होतं, असं नेटकरी म्हणत आहेत.
पार्टी थीमसाठी माकडाला जबरदस्तीने नशा केली –
या संतापजनक घटनेचा व्हिडीओ बांगला अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “मला सांगायला लाज वाटते की, टोकियो रूमने वेगळे दिसण्यासाठी असं कृत्य केलं आहे. हे खूप वाईट असून या पार्टीमध्ये गेलेल्या लोकांना काय झालं आहे, जे या गैरकृत्यानंतरही बोलायला तयार नाहीत, प्राण्यांवरील असे अत्याचार अत्यंत निराशाजनक आहेत.” अभिनेत्रीच्या पोस्टनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. तर या नाईट क्लबने प्राण्यांबाबतच्या अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचं अनेकजण म्हणत आहेत.
घटनेप्रकरणी दोघांना अटक-
माकडासोबत केलेल्या गैरकृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नाईट क्लबवर कारवाई केली असून दोघांना अटक केलं आहे. कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शेक्सपियर सरानी येथील नाईट क्लबच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत थीम पार्टीमध्ये माकडाला साखळदंडाने बांधल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तर आरोपींवर आयपीसीच्या विविध कलमांखाली आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.