Viral Video: ज्याप्रमाणे मनुष्य अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी आयुष्यभर कष्ट करतो, त्याचप्रमाणे निसर्ग नियमानुसार प्रत्येक जीव आयुष्यभर आपली भूक भागवण्याच्या शोधात असतो. अनेकदा जंगलातील प्राणी करत असलेली शिकार पाहून लोक त्यांच्या हिंसक वृत्तीवर चर्चा करतात, पण शेवटी त्यांनादेखील जगण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करणे गरजेचे असते. सोशल मीडियामुळे अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण अवाक व्हाल.
आपल्या जवळच्या व्यक्तीला कोणी मस्करीमध्ये जरी मारलं तरी आपल्याला खूप राग येतो. अशावेळी अनेक जण त्या मारणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवण्याचाही प्रयत्न करतात. ही वृत्ती कित्येकदा प्राण्यांमध्येदेखील पाहायला मिळते. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.
हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका जंगलातील असून या व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, यामध्ये काही बबून जातीची माकडं पळताना दिसत आहेत. तेवढ्यात गवतात लपलेला एक बिबट्या त्यातील एका माकडावर झडप घालतो आणि त्याला आपल्या जबड्यात पकडून घेऊन जातो. पण, माकडाला घेऊन जात असताना मेलेल्या माकडाच्या कळपातील इतर माकडं त्या बिबट्याचा पाठलाग करायला सुरुवात करतात. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर बिबट्या त्या माकडांच्या दिशेने धावतो, त्यावेळी ते सगळे काहीवेळ दूर पळून जातात. त्यानंतर बिबट्या शिकार केलेल्या माकडाला न घेताच पुन्हा आपल्या वाटेने जातो. त्यानंतर सर्व माकडं त्याला शोधू लागतात. हा व्हिडीओ पाहून अनेकांना संकटात धावून येणाऱ्या मित्रांची आठवण येत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Latest Sightings या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेक युजर्सदेखील यावर कमेंट्स करताना दिसत आहेत, “माकडं एकमेकांचे संरक्षण करण्याचा कसा प्रयत्न करतात हे पाहणं खूप सुखद आहे.” तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “माकडे परतल्यावर बिबट्या पुन्हा शिकारीच्या शोधात येईल.” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “निसर्गाच्या नियमाचे पूर्णपणे आश्चर्यकारक फुटेज आहे हे.”