देशाची सेवा करताना प्राण गमावलेल्या शहीदांच्या मुलांच्या वाटेला काय येते याचा साधा विचारही आपल्याला नसतो. घरातला कर्ता पुरुष गमावल्यानंतर त्या कुटुंबाच्या वाट्याला येणा-या दु:खाची आपण कल्पनाही करु शकत नाही. ज्या वयात वडिलांचा आधार गरजेचा असतो तेव्हा डोक्यावरचे छत्र हरवून बसलेल्या या कोवळ्या मनाचे दु:ख काय असू शकते या पुसटशी कल्पना आपल्याला नसते. आपण या मुलांसाठी काय करणार असे म्हणून पुढच्या दोन तीन दिवसात आपण ती गोष्ट विसरूनही जातो. पण सोशल मीडिवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मात्र अशा मुलांशी कसे वागले पाहिजे याचे उत्तम उदाहरण देऊन जाईल. ‘डेट्रोईट फ्रि प्रेस’ने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केलेला १ मिनिटांचा हा व्हिडिओ प्रत्येकाने आवर्जून पाहण्यासारखा आहे. ८ वर्षांच्या वॅनिसा वेगा मुलीचे वडिल १८ ऑक्टोबरला आपले कर्तव्य बजावत असताना मारले गेले. त्यामुळे वेगाच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली. कोवळ्या वयात वडिल जाण्याचे दु:ख काय असू शकते हे या पोलिसांना चांगलेच ठावुक आहे त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर तिच्या बालमनावर कोणताही परिणाम होऊ नये याची पुरेपूर खात्री पाम स्प्रिंग पोलिस विभागाने घेतली आहे. म्हणूनच या विभागातले शक्य असलेले जवळपास सगळेच पोलिस या चिमुकलीला आपल्या वडिलांची कमी भासू न देण्याचे प्रयत्न करतात. वडिलांच्या निधनानंतर याच आठवड्यात पहिल्यांदा वॅनिसा शाळेत जायला निघाली. तिला शाळेत पोहचवण्यासाठी या विभागाचे जवळपास सगळेच कर्मचारी उपस्थित होते. नेहमीप्रमाणे शाळेत जायला निघालेलेल्या वॅनिसाने दरवाजा उघडताच या विभागातले सगळेच पोलीस कर्मचारी तिच्या घराबाहेर उभे होते. त्यांना पाहताच लहागन्या वॅनिसलाही आश्चर्याचा धक्का बसला. खास आपल्याला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या सगळ्या पोलिसांना तिने आनंदाने मिठी मारली. काही वेळासाठी का होईना वडिल या जगात नसल्याचे दु:ख ती विसरली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमधून नक्कीच आदर्श घेण्यासारखा आहे.
Viral Video : शहीद पोलिसाच्या चिमुकलीला मिळणारी वागणूक वाखाणण्याजोगी
शहीदांच्या मुलांशी कसे वागले पाहिजे याचे उत्तम उदाहरण
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 31-10-2016 at 16:07 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than a dozen police officers escorted littel girl after her father has been killed on duty