Mosquito Tornado Pune : तुम्ही आतापर्यंत विविध प्रकारची चक्रीवादळे पाहिली असतील किंवा त्यांचे परिणामही सहन केले असतील. पण, तुम्ही कधी डासांचे वादळ पाहिले आहे का? होय, हे वाचताना थोडे विचित्र वाटेल; पण पुण्यात सध्या डासांच्या वादळाने दहशत निर्माण केली आहे. पुण्याच्या मुठा नदी परिसरात हे डासांचे वादळ घोंगावताना दिसले आणि त्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत; जे पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण- आतापर्यंत कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात डास एकत्र आले नव्हते. त्यामुळे व्हिडीओतील हे दृश्य पाहून लोक हैराण झाले आहेत.
पुण्यातील केशवनगर खराडीजवळील मुठा नदीवरील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मुठा नदीकिनारी वसलेल्या टोलजंग इमारतींवर डासांचे भलेमोठे वादळ घोंगावतेय. लाखो डास एकाच वेळी परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरले आहेत. हे दृश्य पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने फारच धोकादायक आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता पुणेकरांमध्ये डासांची दहशत निर्माण झाली आहे. पुण्यातील हे धक्कादायक दृश्य अनेकांनी आपल्या कॅमेऱ्याद्वारे चित्रबद्ध करून, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे.
अरे, हा तर पोकेमॉन! समुद्रातील ‘तो’ छोटासा सुंदर जीव पाहून युजर्स अवाक्; VIDEO पाहून म्हणाले…
या व्हिडीओत डासांच्या एकाच वेळी सात ते आठ भल्यामोठ्या रांगा आकाशात उडत आहेत. हे दृश्य पाहून कोणीही घाबरेल. पण, एवढ्या मोठ्या प्रमाणातील डासांच्या या सेनेमुळे पुणेकरांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण झाला आहे.
maze.pune नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पुणेकरांनीच भरपूर कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी पुणे तिथे काय उणे, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे म्हणत पुणे महापालिकेच्या कामावर मिश्कीलपणे टीका केली आहे. तर, काहींनी पुण्यात ट्रॅफिकपेक्षा डासांची गर्दी असल्याची कमेंट केली आहे. तर काहींनी, डासदेखील नोकरीच्या शोधात पुण्यात आल्याची मजेशीर कमेंट केली आहे. अशा प्रकारे युजर्स या व्हिडीओवर फार भन्नाट भन्नाट कमेंट्स केल्या जात आहेत. पण, पुण्यात डासांची फौज नेमकी कशामुळे आली आणि कुठून आली याबाबत माहिती समोर आलेली नाही.