माणूसकीला काळीमा फासणारा दहशवाद जगात फोवावत चालला आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, लाखो निरपराध्यांच्या रक्ताचे पाट वाहायचे आणि जगातली शांतता भ्रष्ट करायची हे एकच या दहशतवादी गटांना माहिती आहे. सध्या इसिस ही दहशतवादी संघटना सिरियाचीच नाही तर संपूर्ण जगाची डोकेदुखी ठरत चालली आहे. दरदिवशी इसिसची ही दृष्टकृत्ये वेगवेगळ्या माध्यमांद्वारे जगासमोर येत आहेत. सिरिया, तुर्की, इराक, बांग्लादेश यासारख्या देशांत ही दहशतवादी संघटना सक्रिय आहे. युरोपातील अनेक देशांत या इसिसने अनेक दहशतवादी हल्ले घडवले आहेत. तर अनेक देशांतील मुस्लिम तरूण या संघटनेच्या जाळयात अडकत चालले आहेत. पण इसिसपेक्षाही क्रूर काही दहशतवादी संघटना आहेत.
बोको हराम
नायजेरियातली बोको हराम ही दहशतवादी संघटना सगळ्यात क्रूर दहशतवादी संघटना मानली जाते. क्रूरतेच्या बाबतीत ही संघटना इसिसपेक्षाही एक पाऊल पुढे आहे. २०१४ मध्ये २५० हून अधिक शाळकरी मुलींचे अपहरण करून या दहशतवादी संघटनेने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे खेचले होते. अबु बकर शेकाऊ हा या संघटनेचा म्होरक्या. २०१४ या वर्षांत अत्यंत निर्दयपणे या संघटनेने साडेसहा हजारांहून अधिक लोकांचे प्राण घेतले होते.
तालिबान
अफगाणिस्तानच्या नागरी युद्धातून तालिबानचा जन्म झाला. अफगाणिस्तानच नाही तर पाकिस्तानमध्ये देखील अनेक दहशतवादी हल्ले या संघटनेने केले आहेत. अफगाणिस्तान तसेच पाकिस्तानच्या अनेक भागांत तालिबानने कब्जा केला आहे. तालिबानने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षा दिली जाते आणि आतापर्यंत महिलांनाच सर्वाधिक शिक्षा भोगाव्या लागल्या आहेत.
फुलानी
नायजेरियामधील ही दुसरी दहशतवादी संघटना आहे. पण या दहशतवादी संघटनेबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. नायजेरियातील अनेक गावांतील या स्थानिकांशी या संघटनेचे खटके उडाल्याचे समोर आले. पण ही संघटना नेहमी आपली जागा बदलत असल्याने तिचा नेमका ठावठिकाणा शोधणे कठिण होत चालले आहे. अमानुषपणे नायजेरियातल्या स्त्रीयांचे बलात्कार करणे, निर्दयपणे खून करणे अशी कृत्ये या संघटनेच्या दहशतवाद्यांनी केली आहेत. २०१५मध्ये या संघटनेने नायजेरियात १५० हून अधिक हल्ले केले आहेत.
अल शबाब
एकिकडे बोको हरामने आपण इसिसशी हातमिळवणी केली असल्याचे जाहिर केले तर दुसरीकडे अल शबाब ही अल कायदा या दहशतवादी संघटनेला आपला गुरू मानते. सोमायिलामध्ये या संघटनेने धुडगूस घातला आहे. गेल्या वर्षी या संघटनेने केलेल्या हल्ल्यात १ हजारांहून अधिक निरपराध मारले गेले होते.