Most Delayed Train in Indian Railway history : भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. कारण- रोज हजारो ट्रेन्समधून कोट्यवधी लोक प्रवास करतात. इंग्रजांच्या काळापासून सुरू झालेल्या भारतीय रेल्वेत अनेक बदल पाहायला मिळाले. अनेक अत्याधुनिक ट्रेन्स आल्या; पण भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाल्यास आजही ते कोलमडलेल्या स्थितीत असते.
अनेक कारणांमुळे भारतीय रेल्वे अनेकदा उशिरा धावत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे आता रेल्वे उशिराने धावणे ही अनेक प्रवाशांसाठी फार काही नवीन गोष्ट राहिलेली नाही; पण आपण आज भारतातील अशा एक ट्रेनबद्दल जाणून घेणार आहोत, जिला शेवटचे स्थानक गाठण्यासाठी काही तास किंवा महिने नाही तर तब्बल तीन वर्षे लागली. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या इतिहासातील या ट्रेनने सर्वांत उशिरा धावण्याचा नवा विक्रम केला आहे. आता नेमकी ही घटना काय आहे ते आपण जाणून घेऊ…
Read More Trending News : घरातून येऊ लागला भयानक आवाज; कोपऱ्यातील बॅग उचलताच दिसले असे काही की…; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम
नोव्हेंबर २०१४ मध्ये विशाखापट्टणमहून निघालेली ही ट्रेन शेवटी उत्तर प्रदेशातील बस्ती रेल्वेस्थानकावर जाऊन थांबणार होती. हे अंतर जवळपास १४०० किलोमीटर आहे, जे पार करण्यासाठी साधारण ४२ तास व १३ मिनिटांचा अवघी लागतो. मात्र, या ट्रेनला हेच अंतर पार करण्यासाठी चक्क तीन वर्षे पाच महिन्यांचा काळ लागला. पहिल्या स्थानकावरून निघालेली ही ट्रेन शेवटच्या स्थानकावर पोहोचता पोहोचता २०१८ वर्ष उजाडले.
ट्रेनच्या विलंबनामुळे व्यावसायिकाचे १४ लाखांहून अधिकचे नुकसान
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या ट्रेनमधून खतांच्या पिशव्यांची वाहतूक होत होती. जवळपास १३६१ खतांच्या पिशव्या १४०० किमी अंतर पार करून बस्ती रेल्वेस्थानकावर पोहोचवायच्या होत्या. खतांच्या एकूण पिशव्यांची किंमत १४ लाख रुपयांपेक्षा अधिक होती. रामचंद्र गुप्ता या व्यापाऱ्याच्या नावे या पिशव्या निघाल्या होत्या. मात्र, अपेक्षेप्रमाणे ४८ तासांत पोहोचणारा माल कित्येक दिवस होऊनही इच्छित स्थळी पोहोचलाच नाही. त्यामुळे काळजीत पडलेल्या गुप्ता यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अनेक तक्रारी केल्या, तक्रार अर्ज पाठवले; परंतु काहीच कारवाई झाली नाही. ट्रेन कुठे गेली, कुठे आहे याचा काहीच मागोवा घेता आला नाही.
त्यानंतर अनेक वर्षे शोध घेतल्यानंतर अखेर साडेतीन वर्षांनंतर म्हणजे जुलै २०१८ मध्ये ही ट्रेन बस्ती स्थानकावर आली; पण तोपर्यंत त्यावरील खतांचे मोठे नुकसान झाले होते. पण, साडेतीन वर्षे ही ट्रेन नेमकी कुठे होती, शेवटच्या स्थानकावर पोहोचण्यास या ट्रेनला इतका उशीर का लागला याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
© IE Online Media Services (P) Ltd