रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करू नका असे वारंवार सांगितले जाते पण कोण ऐकेल तर शपथ ना! आपला प्राण धोक्यात घालून लोक सर्रास रेल्वे रुळ ओलांडतात. दरदिवशी यामुळे कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागतात किंवा हात पाय तुटून त्यांना कायमचे अपगंत्व येते. याविषयी इतकी जनजागृती करुनही काहीच उपयोग नाही याचे ताजे उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्टेशनवरचा हा व्हिडिओ. एक वृद्ध महिला ट्रेन समोरुन येत असतानाही रेल्वे रुळावर बेफिक्रीने चालत येत होती. शेवटी मृत्यू अधिक जवळ येत आहे असे दिसतातच तिने प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न केला. तिच्या या मूर्खपणामुळे काही सेंकदात होत्याचे नव्हते झाले असते. पण सुदैवाने मोटरमनला ट्रेन थांबवायला यश आले आणि तिचे प्राण वाचले.

चर्नी रोड स्टेशनवरचा एक व्हिडिओ सध्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅपवर व्हायरल होत आहे. एक वृद्ध महिला रेल्वे रुळ ओलांडताना दिसत आहे. समोरून ट्रेन येत आहे हे दिसत असतानाही तिने रुळावरून पळण्याचा प्रयत्न केला नाही. ट्रेन अगदी जवळ आली तेव्हा मात्र तिने फलाटावर चढण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही तिला यश येईना, अशावेळी रेल्वेच्या मोटारमनने प्रसंगावधानता दाखवत वेळीच ब्रेक लावला आणि तिच्यापासून अगदी हातभर अंतरावर ट्रेन थांबली. अगदी काही सेंकद जरी उशीर झाला असता तरी या वृद्ध महिलेने आपले प्राण गमावले असते, म्हणूनच या मोटारमनचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. पण दुसरीकडे ज्याने याचे रेकॉर्डिंग केले त्यावरही सडकून टिका केली जात आहे. जर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापेक्षा तिचे प्राण वाचवायचा प्रयत्न केला असता तर त्याच्या हातून चांगले काम घडले असते अशाही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर येत आहेत.

Story img Loader