आईच्या मायेविषयी नव्याने काही सांगायंला नको. आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार होणारी आई प्रसंगी आपल जीव धोक्यात घालूनही आपल्या मुलांचं रक्षण करेल.

प्राणिजगताविषयीही काही वेगळं सांगायला नको. प्राण्यांमध्येही आईच्या तिच्या पिल्लांप्रती व्यक्त होणारं प्रेम तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसतं. आपल्या घरी असणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीत तर आपण हे पाहतोच. पण जंगली प्राण्यांमधली ममतेची भावना आपल्याला टीव्ही कार्यक्रमांच्या माध्यामातून आपल्यासमोर येते. आपल्या भक्ष्याला फाडून खाणाऱ्या वाघिणीचा अजस्त्र जबडा ती तिच्य़ा पिल्लांना तोंडाने उचलत असताना किती हळूवार होतो हे आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलंय.

प्राण्यांच्या बाबतीत त्यांच्या या भावभावना स्पष्टपण कळून येतात. पण पक्ष्यांच्या बाबतीत हे भाव चटकन ओळखता येत नाहीत. आपल्या पिल्लांच्या प्रती त्यांच्या मनात प्रेमभावना असतेच. पण ती आपल्याला त्यांच्या हावभावावरून चटकन ओळखू येत नाही.

पण अमेरिकेतल्या सिनसिनॅटी राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना आलेल्या एका आश्चर्यकारक अनुभवाची सगळीकडे चर्चा होत आहे. या राज्यात एका ठिकाणी एका ओढ्याजवळ पोलिसांच्या गाडीत दोघे अधिकारी बसले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या गाडीच्या दारावर टकटक एेकू आली. गाडीबाहेर कोणी दिसत नसतानाही ही टकटक झाल्याने हे दोघे अधिकारी आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्यांच्या गाडीचं दार उघडल्यावर तिथे त्यांना एक ‘गूस’ म्हणजेच राजहंसाचा एक प्रकार असलेला एक पक्षी दिसला. या दोघांना गंमत वाटून त्यांनी त्या पक्ष्याला खायला दिलं. पण त्यांनी दिलेलं खाणं न खाता तो पक्षी कारपासून थोडं दूर जाऊन पुन्हा या अधिकाऱ्यांकडे पाहायला लागला.

त्या पक्ष्याचं हे वागणं काहीसं वेगळं वाटल्याने हे दोघे अधिकारी; ज्यापैकी एक महिला अधिकारी होती; त्या पक्ष्याच्या मागे चालायला लागले. ते येत आहेत असं पाहिल्यावर तो पक्षी पुन्हा पुढे गेला आणि पोलिसांच्या येण्याची वाट पाहायला लागला. असं त्या ओढ्याच्या दिशेने काही वेळ चालल्यानंतर या अधिकाऱ्यांना लक्षात आलं की ही पक्षीण त्यांना आपल्या पिलांकडे नेत आहे.

या पक्षिणीची पिल्लं त्या ओढ्याजवळ एका फुग्याच्या दोऱ्यात अडकून बसली होती. त्या पाच-सहा पिल्लांनी खूपच फडफड केल्याने ती दोरी त्या सगळ्यांभोवती गुंडाळली गेली होती . ही पक्षीण तिच्या या पिलांजवळ चालत आली आणि पुन्हा या दोघांकडे पाहू लागली.

त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला! ही पक्षीण त्यांच्याकडे मदत मागत होती!

या अधिकाऱ्यांपैकी महिला अधिकाऱ्याने मग पुढे जात या पिल्लांना एक-एक करत सोडवलं. हा सर्व वेळ या पिल्लांची आई काळजीपूर्वक आपल्या पिल्लांकडे आणि त्या महिला पोलीस अधिकाऱ्याकडे पाहत होती. या प्रकारचे हंस फार आक्रमक आणि माणसांवर हल्ले करणारे मानले जातात. पण ही पोलीस अधिकारी या पिल्लांची सुटका करत असताना त्या पक्षिणीने बिलकूल हल्ला केला नाही.

एक एक करून ही पिल्लं दोरीच्या वेटोळ्यातून सुटली आणि पळतच ओढ्यामध्ये गेली. सगळ्या पिल्लांची सुटका झाल्यावर ही पक्षीणही त्यांच्यापाठोपाठा ओढ्याच्या दिशेने निघाली. पण पाण्यात उतरण्यापूर्वी तिने आपल्याला मदत करणाऱ्या या दोघा ‘माणसांकडे’ पाहिलं. आणि मग हळूवारपणे ती आपल्या रस्त्याने पुढे गेली.

हा सगळा प्रकार या महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत असणाऱ्या तिच्या सहकाऱ्याने शूट केला. पाहा हा व्हिडिओ

 

सौजन्य- यूट्यूब

Story img Loader