अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेतील एका मुलावर बेघर होण्याची वेळ आली आहे. अमेरिकेतील बहुचर्चित निवडणुकीपूर्वी शाळेमधील निवडणुकीच्या रंगीत तालिमीवेळी या मुलाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने मत नोंदविले होते. त्याच्या या कृतीमुळे मुलाच्या आईने त्याला घराबाहेर काढून आपला राग व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोधकरणाऱ्या महिलेने आपल्या मुलावर व्यक्त केलेल्या रागाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये आईने घराबाहेर काढलेला मुलगा आपल्या सामानासोबत दाराच्या बाहेरील बाजूस रडत आपल्या आईची माफी मागताना दिसत आहे. तर डोनाल्ड ट्रम्पला मत दिल्यामुळे तुला ही शिक्षा भोगावीच लागेल, असे ही महिला आपल्या मुलाला सांगताना दिसते. आईने आपल्याला घराबाहेर काढले असल्याचे सांगण्यासाठी मुलाने हातात एक फलक घेतला आहे. या फलकवर त्याने ट्रम्प यांना मत दिल्यामुळे आईने घराबाहेरचा रस्ता दाखविल्याचा उल्लेख केला आहे. आईने ज्यावेळी या मुलाला ट्रम्प यांना मत का दिले याची विचारणा केली, यावेळी मुलाने ट्रम्प यांना अधिक प्रमाणात टीव्हीवर पाहिल्यामुळे त्यांना मतदान केल्याचे सांगितले.
अमेरिकन निवडणुकीमध्ये डेमोक्रँटीक पक्षााच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना पराभूत करुन रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय नोंदविला होता. अमेरिकेतील निवडणुकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प महिलांविरोधी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अमेरिकेतील अनेक महिलांनी ट्रम्प यांना विरोध देखील दर्शविला होता. पण अखेर ट्रम्प यांनी २७६ मते मिळवत निवडणुकीत बाजी मारली.

सध्या ट्रम्प यांच्या निवडीविरोधात अमेरिकेत निदर्शने करण्यात येत आहेत. अमेरिकेतील काही नागरिकांना ट्रम्प विनाशकारी वाटत आहेत. जानेवारी महिन्यात सूत्रे स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांच्या धोरणांचे आपण बळी ठरू असे वाटणाऱ्या मेक्सिकन आणि मुस्लीम नागरिक ही निदर्शने करत आहेत.