Mother Emotional Video : ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे म्हणतात ते काही खोटं नाही. आई आपल्या लेकरांसाठी काहीही करायला तयार होते. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. अगदी जन्म दिल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांना सांभाळते, त्यांचं रक्षण करते. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.

घराला हातभार लावणारी आई स्वत: उपाशी राहते, पण आपल्या मुलांना सगळं खाऊ घालते. आपल्या मुलांना सगळं काही मिळावं, दोन वेळची भूक भागावी म्हणून दिवसभर आई कष्ट करत असते. अशावेळेस अनेकदा तिला वाकडं पाऊल उचलावं लागतं. पण, लेकरांसाठी ती तेही करते. सध्या अशाच आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक वेळचं जेवण मिळावं म्हणून आई धडपड करताना दिसतेय.

आईची पोटासाठी कसरत

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक आई भुकेसाठी संघर्ष करताना दिसतेय. एक महिला मदतनीस म्हणून एका कुटुंबीयांसाठी काम करताना दिसतेय. किचनमध्ये ती पोळ्या लाटताना आणि भाजताना दिसतेय. पोळ्या लाटत असताना ती तिच्याजवळ असलेला एक कपडा काढते आणि त्यात काही पोळ्या भरते आणि या पोळ्या त्या कपड्यात बांधून स्वत:जवळ लपवून ठेवते आणि पुन्हा एकदा नव्याने पोळ्या बनवायला सुरुवात करते.

आईचा हा व्हायरल व्हिडीओ @_shubham_yadav. या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “क्या इस चोरी की सजा को माफ करना चाहिए या दंड देना चाहिए” (या चोरीची शिक्षा माफ करावी की या चोरीसाठी शिक्षा द्यावी?) अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “माफ केलं पाहिजे”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हा व्हिडीओ पाहून माझे डोळे भरून आले, शेवटी आईचं काळीज, तिने आपल्या लेकरांसाठी सर्व मर्यादा ओलांडल्या” तर एकाने “पोळी तोच चोरतो, ज्याच्या पोटाची खळगी रिकामी असते” अशी कमेंट केली आहे.

Story img Loader