Delhi Police Moye Moye Trend: सोशल मीडियावर ट्रेंड फॉलो करण्याची स्पर्धा सुरू आहे. रोज काही तरी नवीन व्हायरल होतं आणि लोक त्याप्रमाणे करू लागतात. प्रत्येकजण आपल्या अंदाजात ट्रेंड्स फॉलो करत हटके क्रिएटिव्हीटी दाखवल्याचा आनंद घेतात. यात दिल्ली पोलिसही मागे नाहीत. सध्या सोशल मीडियावर मोये मोये गाणं खूप ट्रेंड करत आहे. या ट्रेंडमध्ये आता दिल्ली पोलिसही सहभागी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी हा ट्रेंड फॉलो करत स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकांना क्रिएटिव्ह ढंगात सावधानतेचा इशारा दिला.

दिल्ली पोलिसांनी अपघात टाळण्यासाठी वाहन चालवताना नियमांचे पालन करण्याचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी (@DelhiPolice) या एक्स अकाउंटवर बाइक स्टंटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, वाहनावरील नियंत्रण गमावू नका, अन्यथा घडू शकते मोये, मोये. या व्हिडीओत एक बाइकस्वार रिकाम्या रस्त्यावरून स्टंट करत वेगाने जाताना दिसत आहे. यावेळी रायडर बाइकच्या मागील चाकावर तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतो असतो. पण, नियंत्रण गमावून जोरात खाली कोसळतो आणि त्याचा भीषण अपघात होतो. यावेळी तो काही अंतर फरफटत जातो.

पश्चिम बंगाल पोलिसांनीही घेतला ट्रेंडमध्ये सहभाग

दुसरीकडे पश्चिम बंगाल पोलिसांनीही इन्स्टाग्रामवर बाइकवर स्टंटबाजी करत दारू पिणाऱ्या दोन तरुणांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडलाही मोये, मोये गाणं वाजताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी बंगाली भाषेत लिहिले आहे, ज्याचा हिंदीत अर्थ असा आहे की, तुम्हाला एकच जीवन मिळाले आहे, ते वाया घालवू नका. रहदारीचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा.

पश्चिम बंगाल पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, चालत्या बाईकवर दोन व्यक्ती दारू पिताना दिसत आहेत. यावेळी मागे बसलेला व्यक्ती स्टंट करण्याचा प्रयत्न करतो आणि घसपटत जाऊन रस्त्याच्या कडेला पडतो.

दिल्ली आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी शेअर केलेला व्हिडीओ महत्वपूर्ण मेसेज दिल्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

मोये मोये ट्रेंड नेमका आहे तरी काय?

रील्सच्या जगात ‘मोये मोये’ गाण्याचा जबरदस्त ट्रेंड पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे लोक या गाण्याचा उच्चार चुकीचा करून आनंद घेत आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर हे गाणं सध्या खूपच ट्रेंड झाले आहे. पण, या व्हायरल गाण्याचे खरे बोल ‘मोये मोये’ नाहीत. सर्बियन म्युझिक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा ट्रेंड सुरू झाला. या म्युझिक व्हिडीओचे नाव आहे ‘Dzanum’ (डजानम).

हे सर्बियन गायक तेजा डोरा हिने गायले आहे. हे गाणे तेजा डोरा यांनी सर्बियन रॅपर स्लोबोदान वेल्कोविक कोबीसोबत लिहिले होते, पण या गाण्यात ‘मोये मोये’ कुठेही म्हटलेले नाही, तर ‘मोजे मोर’ असे म्हटले आहे. गुगल ट्रान्सलेटरच्या मते ‘मोजे मोर’चा हिंदीतील अर्थ ‘माझा समुद्र.’

Story img Loader