दारू पिण्याचं व्यसन वाईट आहे, असं आपण सातत्याने ऐकत असतो. दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आपणही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली असतील, पण तरीही लोक दारू पितात. काहीही झालं तरी दारू सोडत नाहीत. यासाठी अनेक गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये दारूबंदी विरोधात मोर्चे सुरू आहेत. अनेक गावांत दारूबंदीसाठी विशेष मीटिंग घेतल्या जातात, पण एवढं सगळं असतानाही दारू शौकिनांना दारू पिण्याचा मोह काही आवरत नाही. अशाच एका दारूप्रेमीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तो एका बिअरच्या बाटलीवर दुकानदाराने ५० रुपये जास्त घेतल्याने चक्क आत्महत्या करायला निघाला. यानंतर झाडावर चढून त्याने असा काही धिंगाणा घातला की पोलिसांनाही आवरताना नाकी नऊ आले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, नेमकी ही घटना काय आणि कुठे घडली जाणून घेऊ…
मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यात घडली आहे. जिथे गेल्या महिन्यात एका तरुणाकडून मद्य विक्रेत्याने बिअरच्या एका बाटलीवर ५० रुपये जास्त घेतले. याबाबत पीडित तरुणाने पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र, तक्रार करून महिना उलटला तरी कोणतीही कारवाई न झाल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कठोर पाऊल उचलले. ब्रिजमोहन शिवहरे असे या तरुणाचे नाव आहे. त्याने यासंदर्भात मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केली. मद्य विक्रेत्याने १०० रुपयांच्या क्वार्टरवर २० रुपये आणि बिअरच्या बाटलीवर ३० रुपये जादा आकारल्याबद्दल त्याने ही तक्रार केली होती.
पैसे कमावण्यासाठी भन्नाट जुगाड; महामार्गावरील रस्तादुभाजकाला लावल्या शिड्या अन्… पाहा video
निराश होत आत्महत्या करण्यासाठी चढला झाडावर अन्….
ब्रिजमोहनने मानवाधिकार आयोगाव्यतिरिक्त, सीएम हेल्पलाइन, पोलिस ठाणे, एसडीएम आणि डीएमकडेही तक्रार केली होती, परंतु महिनाभर कथित मद्य विक्रेत्याकडून सुरू असलेल्या गैरकारभाराविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्याने निराश होऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ब्रिजमोहनने झाडावर चढून तेथून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, पण वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला झाडावरून सुखरुपपणे खाली उतरवले.
या घटनेबाबत एका व्हिडीओत ब्रिजमोहनने सांगितले की, हे लोक पैसे उकळतात. तुम्ही तक्रार केली किंवा विरोध केला तर ते तुम्हाला मारहाण करतात. मी दोन महिन्यांपासून कामावर गेलो नाही, मी भाडेही देऊ शकत नाही आणि वरती हे लोक पैसे उकळतात. पोलिस ठाण्यात तक्रार करुन करुन आता वैतागलो. यापुढे त्याने सांगितले की, त्यांच्या विरोधात तक्रार केली तेव्हा मला मारहाण करण्यात आली. राम मंदिर उद्घाटन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशीदेखील या ठिकाणी दारू विक्री सुरू असल्याचा आरोप त्याने केला.