Son Made Sleepers With Own Skin For Mother: आपल्याला या जगात आणण्यासाठी नऊ महिने रक्ताचं पाणी करणाऱ्या आईचे पांग फेडणे कदाचित कधीच कुणाला शक्य होणार नाही. खरं सांगायचं तर आपल्या बाळाने आपल्यासाठी काही करावे अशी अपेक्षाही कोणती आई ठेवत नाही. अशाच एका निस्वार्थी आईला तिच्या श्रावण बाळाने दिलेल्या अनोख्या गिफ्टची सध्या चर्चा होत आहे. “तुझे माझ्यावर इतके उपकार आहेत की माझ्या कातड्याचे जोडे जरी काढून तुला अर्पण केले तरी कमी पडेल”, हे वाक्य आपणही आजवर ऐकलं असेल, ऐकायला- वाचायला सुंदर वाटत असलं तरी हा एका प्रकारे ‘अतिशयोक्ती अलंकाराचा’ भाग आहे हे आपणही जाणतो. पण असं आता प्रत्यक्षात घडल्याचं समजतंय, ते ही आपल्या भारतातच!
उज्जैन मधील रौनक गुर्जर या इसमाने आपल्या आईला आपल्या स्वतःच्या कातडीचे जोडे बनवून भेट केले आहेत. रौनक हा मागील काही काळात नेहमी रामायणाचे पठण करत होता, यावरून त्याला प्रेरणा मिळाली आणि त्याने आपल्या आईसाठी स्वतःच्या कातडीचे जोडे बनवण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या जांघेतील त्वचा काढून त्याचे जोडे बनवले आहेत, अलीकडेच त्याने भागवत कथा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, या कार्यक्रमाच्या उद्यापनाच्या दिवशी त्याने आईला हे सरप्राईज दिले. जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याचे ऑपरेशन पार पडले व त्याच दिवशी त्याने हे कातड्याचे जोडे आईच्या पायात घातले .
कातड्याचे जोडे घातल्यावर आई म्हणाली..
भागवत कथेचे पठण करणाऱ्या जितेंद्र महाराजांनी यावेळी रौनक याची तुलना श्रावण बाळासह करून आजच्या युवा पिढीने निदान आपल्या आई वडिलांचा मान- सन्मान राखणे व त्यांना प्रेमाने वागवणे हे कर्तव्य तरी पूर्ण करायला हवे असा सल्ला दिला. जेव्हा रौनकने आपल्या आईला हे कातड्याचे जोडे घालायला दिले तेव्हा आईने तर अगदी ओक्सबोक्शी रडायला सुरुवात केलीच पण उपस्थितांचे डोळे सुद्धा पाणावले होते. यावेळी प्रतिक्रिया देताना रौनक याची आई म्हणाली की, “असा मुलगा प्रत्येक आईला मिळायला हवा, त्याने मला प्रत्येक संकटातून वाचवले आहे, पुत्राचे कर्तव्य निभावले आहे. मी देवाकडे प्रार्थना करते की त्याची सगळी दुःख मला मिळूदे.”
हे ही वाचा << आईस्क्रीम विक्रेत्याने हस्तमैथुन करत फालुद्यात मिसळलं वीर्य; किळसवाणा Video व्हायरल, पोलिसांनी केली अटक
अटकेने बदललं जीवन
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, दरम्यान, रौनकचे हे वर्तमानातील वागणे आश्चर्यकारक असले तरी भूतकाळ फार आदर्श नव्हता असेच म्हणता येईल. काही वर्षांपूर्वी रौनक एका फौजदारी प्रकरणात फरार होता, तेव्हा त्याला पकडताना पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी सुद्धा मारली होती. तुरुंगातून सुटल्यावर त्याने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. सामाजिक व धार्मिक कामातील त्याची आवड वाढू लागली. त्याने त्याचा व्यवसायही उभारला.