मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमधील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक संतापलेली महिला स्कॉर्पिओच्या काचा रॉडने फोडताना दिसत आहे. तर स्कॉर्पिओचा मालक आणि त्याच्या घरातील सदस्य या महिलेला काचा फोडू नका असं सांगत आहेत. या घटनेबाबतच स्कॉर्पिओच्या मालकाने महिले विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नरसिंगपूर जिल्ह्यातील गादरवारा येथील असून येथे दिवाळीच्या सणानिमित्त एका महिलेने घरासमोर रांगोळी काढली होती. यावेळी एका स्कॉर्पिओ चालकाने रांगोळीवर गाडी घातल्यामुळे रांगोळी पुसली गेली. आपली रांगोळी खराब झाल्याचं पाहताच महिला संतापली आणि तिने रांगोळीवरुन गेलेल्या कारच्या काचा फोडायला सुरुवात केली.
हेही वाचा- ट्रोलिंगला कंटाळून अल्पवयीन इन्फ्लुएन्सरची आत्महत्या, साडी नेसलेला फोटो पोस्ट केला अन्…
महिलेच्या या हल्ल्यामुळे कारची समोरील काच फुटल्याचं व्हिडीओत दिसत आहे. स्कॉर्पिओची तोडफोड केल्याप्रकरणी कार चालकाने गादरवाडा पोलीस ठाणे गाठून महिले विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पण या महिलेने एवढ्या शुल्लक कारणावरुन कारच्या काचा फोडल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक संतापलेली महिला हातात काठी घेऊन स्कॉर्पिओ फोडण्यासाठी आल्याचं दिसत आहे. यावेळी ती रागाने कारच्या समोरच्या काचेवर काठ्या मारते ज्यामुळे स्कॉर्पिओची काच फुटल्याचं दिसत आहे. शिवाय यावेळी ती “कार चालवताना आंधळा झाला होतास का? शूटिंग करा नाहीतर पोलिसांना बोलवं,” असं म्हणत असल्याचंही ऐकू येत आहे.