रुग्णालयात एमआरआयसाठी जातो तेव्हा आरोग्य कर्मचारी तुम्हाला आधीच सांगतात की, चुकूनही धातूपासून बनवलेल्या वस्तू बरोबर घेऊ नका, अंगावरील दागिने काढून ठेवा. यावेळी बऱ्याच लोकांना असं वाटतं की, हे स्वच्छता किंवा संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी असं सांगितलं गेलं आहे. पण, हे खरं नाही. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर तुम्हाला खरं कारण काय आहे ते समजेल. त्यानंतर तुम्हीदेखील एमआरआय रूममध्ये धातूच्या वस्तू घेऊन जाणार नाही. यावेळी भले तुमच्या ओळखीचा कोणी हॉस्पिटल कर्मचारी असला तरी तोही तुम्हाला असे करू देणार नाही.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुग्णालयातील एका रूममध्ये एमआरआय मशीन ठेवली आहे. यावेळी काही कर्मचारी काही ना काही वस्तू त्या मशीनजवळ घेऊन जातात, तेव्हा एमआरआय मशीन चुंबकाप्रमाणे सर्व काही लोखंडी वस्तू स्वत:कडे आकर्षून घेते. एक महिला हातातील कोणती तरी छोटी वस्तू मशीनच्या दिशेनं धरताना दिसतेय. तिनं वस्तू मशीनच्या जवळ नेताच काही क्षणांत ती वस्तू मशीननं स्वत:कडे खेचून घेतली. व्हिडीओ पाहून तुम्हाला समजलं असेल की, या मशीनमध्ये एक शक्तिशाली चुंबक आहे; जो लोखंडापासून बनवलेल्या सर्व वस्तू वेगाने आकर्षित करतो.
MRI चा अर्थ आहे, मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग स्कॅन. या मशीनमध्ये एक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार होते. अशा परिस्थितीत आत जाताना शरीरावर कोणत्याही धातूच्या वस्तू असू नयेत. अगदी घड्याळे, दागदागिने जसे की नेकलेस, चेन कानातले, ब्रॅस्लेट, डेन्चर, श्रवणयंत्र, विग; ज्यात धातूचा वापर केलेला असतो अशा वस्तू घेऊन जाऊ नये. अशा वस्तू तुम्ही एमआरआय मशीनजवळ घेऊ जाऊ नका. कारण- ही मशीन धातूच्या वस्तू लगेच स्वतःकडे खेचून घेते. जर शरीरात स्क्रू, शॉपनेल किंवा काडतुसाचे काही तुकडे असतील, तर ते धोकादायक ठरू शकतात. धातूचे हे तुकडे चुंबकांद्वारे अतिशय वेगानं खेचले जातील आणि त्यामुळे शरीराला गंभीर इजा होईल.
काही वर्षांपूर्वी अशी अनेक प्रकरणं उघडकीस आली; ज्यात एमआरआय मशीनकडे जाताना धातूच्या वस्तू नेल्यानं अपघात झाले आहेत. त्यात लखनौमध्ये एक नेता एमआरआय मशीनमध्ये बंदूक घेऊन निघून गेला आणि त्याचा भयानक परिणाम झाला. मुंबईत एक व्यक्ती ऑक्सिजन सिलिंडर सोबत घेऊन गेल्यानं त्याच्या शरीरात जास्त प्रमाणात लिक्विड ऑक्सिजन गेले आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे तुम्हीही अगदी लहान धातूची वस्तू जरी घेऊन गेलात तरी अशी दुर्घटना घडू शकते.