महेंद्रसिंग धोनी सध्या भारतीय लष्कारच्या सेवेत काश्मीरमध्ये रुजू झाला आहे. लेफ्टनंट कर्नल असणारा धोनीची नियुक्त काश्मीरमधील १०६ टीए बटालियनमध्ये (पॅरा) करण्यात आली आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर काश्मीरमधील वातावरण तापलेले असतानाच धोनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये स्थानिक तरुणांनी धोनीसमोर ‘बूम बूम आफ्रिदी’ अशी घोषणाबाजी केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी काश्मीरी तरुणांच्या हृद्यात धोनी नाही तर आफ्रिदी अशा मथळ्याखाली प्रकाशित केला आहे.

आपल्याला सैन्यदलाची सेवा करायची असल्यामुळे दोन महिने विश्रांती घेत आहोत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळवत धोनी सैन्यदलात रुजू झाला आहे. धोनीच्या या निर्णयाचे सर्व स्तरांमधून स्वागत झाले असून त्याच्या अनेक चाहत्यांना धोनी सैन्याच्या छावणीमध्ये काय काय करतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. त्याच जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्यासंदर्भात केंद्राने निर्णय घेतल्याने राज्यातील वातावरण आणखीनच संवेदनशील झाले आहे. त्यातच आता धोनीसंदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे. स्थानिक काश्मीरी तरुणांना धोनीचे राज्यात येणे फारसे आवडल्याचे चित्र दिसत नाही. धोनी बारामुला येथील लष्करी छावणीमध्ये गेला असता त्याला पाहण्यासाठी तेथे स्थानिक तरुणांनी मोठी गर्दी केली होती. धोनी या ठिकाणी आल्यावर गाडीमधून उतरुन छावणीकडे जात असताना या तरुणांनी पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या नावाने घोषणाबाजी केली. ‘बूम बूम आफ्रिदी… बूम बूम आफ्रिदी..’ अशी घोषणाबाजी करताना हे तरुण व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

सध्या धोनी लष्कारासोबत ट्रेनिंग घेत असून धोनी जवानांसोबतच राहत आहे. ३१ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान धोनी काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत गस्त घालणार आहे. दरम्यान आफ्रिदीने भारताने कलम ३७० संदर्भात घेतलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता.

Story img Loader