राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या वार्षिक तीन दिवसीय संमेलनाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रदर्शनात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा फोटो लावल्याने चर्चेला उधाण आलं आहे. गुजरातमधील प्रख्यात व्यक्ती असलेल्या २०० व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. या फोटोनंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ११ मार्च ते १३ मार्च या कालावधीत अहमदाबादच्या पिराना गावात श्री निशकलंकी नारायण तीर्थधाम प्रेरणापीठ येथे वार्षिक “अखिल भारतीय प्रतिनिधी संमेलन” आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे तीन प्रमुख मान्यवर उपस्थित असणार आहेत. बंद दरवाज्याआड असलेल्या कार्यक्रमात देशभरातून संघाचे १,२४८ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रतिनिधींना राज्याच्या संस्कृती आणि इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आरएसएस गुजरात प्रांताने गुजरातमध्ये घडलेल्या विविध कलाप्रकार, हस्तकला आणि भरतकाम, लोकसंस्कृती, परफॉर्मिंग आर्ट्स, वन्यजीव आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनांचे चित्रण करणारे प्रदर्शन दालन आयोजित केले आहे. गुजरातमधील २०० मानाच्या व्यक्तींना मानाचं स्थान देण्यात आलं आहे. प्रदर्शनात, गुजरातमध्ये मूळ असलेल्या २०० प्रतिष्ठित व्यक्तींची चित्रे दर्शविणारा एक महाकाय बिलबोर्ड लावण्यात आला आहे. यात महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, उद्योगपती धीरूभाई अंबानी, रतन टाटा आणि अझीम प्रेमजी, सामाजिक उद्योजक वर्गीस कुरीयन यांचा समावेश आहे. या यादीत भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई, क्रिकेटपटू विनू मांकड, तसेच बॉलीवूड कलाकार अभिनेते परवीन बाबी, संजीव कुमार आणि डिंपल कपाडिया यांचाही समावेश आहे. या यादीत मोहम्मद अली जिना यांचाही फोटो आहे.
जिना यांचे कुटुंब सौराष्ट्रातील राजकोट जिल्ह्यातील मोती पानेली गावचे होते. या फोटोखाली कॅप्शनही लिहिण्यात आली आहे. “एक बॅरिस्टर जो सुरुवातीला कट्टर देशभक्त होता, नंतर धर्माच्या आधारावर भारताची फाळणी केली.” या फोटो आणि कॅप्शनमुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. दुसरीकडे प्रदर्शनामागील संकल्पना स्पष्ट करताना, तीन दिवसीय कार्यक्रमाचे समन्वयक शिरीष काशीकर म्हणाले, “ईशान्य, पश्चिम बंगाल किंवा दक्षिणेकडील राज्यांतून आलेले संघाचे प्रतिनिधी या माध्यमातून गुजरातच्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख करून घेऊ शकतात. हे प्रदर्शन. अनन्य वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करून आम्ही ऐतिहासिक काळापासून राज्याच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पैलूंवर प्रकाश टाकला आहे.”
निवडणूक निकालानंतर इंधनाचे दर कमी होणार! काय आहे रशियन कंपन्यांचा प्रस्ताव, जाणून घ्या
“आम्ही दुर्लक्षित झालेल्या वीरांच्या कथा, विशेषत: गुजरातमधील भील आणि आदिवासी समुदायांच्या कथा ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला. परंतु आमच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख केलेला नाही.” संघाच्या विचारसरणीशी एकरूप नसलेल्या जिना आणि इतर लोकांच्या उल्लेखाबद्दल विचारले असता काशीकर म्हणाले, “आम्ही त्या काळात भारतासाठी योगदान दिलेल्या लोकांची नावे जोडली आहेत. केवळ आरएसएसचा कार्यक्रम असल्यामुळे, याचा अर्थ असा नाही की आम्ही केवळ आमच्या विचारधारेशी जुळलेल्या लोकांनाच त्यात समाविष्ट करू.”
२००९ मध्ये गुजरात सरकारने भाजपचे निष्कासित नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांच्या “जिना-इंडिया, विभाजन, स्वातंत्र्य” नावाच्या पुस्तकावर बंदी घातली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संदर्भातील पुस्तकातील उल्लेखांवर आक्षेप घेतल्यानंतर बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे २००५ मध्ये, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी कराचीतील जिना यांच्या समाधीला भेट देत “महान माणूस” म्हणून प्रशंसा केली, त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.