मोहरम हा इस्लामिक दिनदर्शिकेचा पहिला महिना आणि रमजाननंतरचा दुसरा पवित्र महिना आहे. हिर्जी दिनदर्शिकेनुसार इस्लामिक नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. हिरजी दिनदर्शिका चंद्राच्या चक्रावर आधारित असते. ज्यामुळे ते ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा वेगळे आहे. मुहर्रम शब्दाचा अर्थ ‘परवानगी नाही’ किंवा ‘निषिद्ध’ असा आहे. म्हणून मुस्लिमांना युद्धासारख्या कार्यात भाग घेण्यास मनाई आहे. म्हणून हा महिना म्हणजे प्रार्थना आणि चिंतन कालावधीसाठी पाहिला जातो.
भारतभर खरंतर मोहरम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भव्य मिरवणुका काढल्या जातात. परंतु यावर्षी कोरोना परिस्थितीमुळे सार्वजनिक कार्यक्रम किंवा मेळाव्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे, राज्यांनी मोहरमच्या मिरवणुका काढण्याची परवानगी यंदा दिलेली नाही. दरम्यान, आता मोहरमच्या निमित्ताने विविध राज्य सरकारांनी जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या तारखांवर एक नजर टाकूया.
अनेक राज्य सरकारांनी मोहरमच्या सुट्ट्यांमध्ये बदल केला करून नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये कोणत्या दिवशी मोहरमची सुट्टी देण्यात आली आहे? पाहूया
राज्य सरकारांकडून तारखा जाहीर
- दिल्ली सरकारने बुधवारी मोहरमकरिता २० ऑगस्टच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. दरम्यान, त्यापूर्वी दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने (GAD) १९ ऑगस्टच्या दिवशी म्हणजे आज हि मोहरमची सुट्टी जाहीर केली होती. मात्र, या संदर्भात केंद्र सरकारच्या निर्णयानंतर ही सुट्टी बदलून शुक्रवारी अर्थात २० ऑगस्ट रोजी देण्यात आली आहे.
- उत्तर प्रदेशात देखील शुक्रवारी म्हणजे २० ऑगस्ट रोजी मोहरम साजरा केला जाईल.
- महाराष्ट्रात २० ऑगस्ट रोजी (शुक्रवारी) मोहरमचा सण साजरा करण्यात येणार आहे.
- आसाम सरकारने देखील बुधवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात, राज्यात मोहरमच्या मुहूर्तावर सरकारने २० ऑगस्टला अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे.
- पुद्दुचेरीच्या माहे प्रदेशात गुरुवारी म्हणेजच आज १९ ऑगस्ट रोजी मोहरम साजरा केला जात आहे. तर पुडुचेरी सरकारच्या आदेशानुसार कराईकल आणि पुडुचेरी आणि यनाममध्ये शुक्रवारी मोहरम साजरा केला जाईल.
- छत्तीसगड सरकारने शुक्रवारी मोहरम सुट्टी जाहीर केली आहे.
- दिल्लीप्रमाणेच आंध्र प्रदेश सरकारनेही मोहरम सुट्टी १९ ऑगस्टऐवजी २० ऑगस्ट रोजी (शुक्रवारी) बदलून दिली आहे.
- मध्य प्रदेश देखील २० ऑगस्ट रोजीच मोहरम साजरा करत आहे.
- हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि झारखंडमध्येही २० ऑगस्ट रोजी मोहरम साजरा केला जाईल.
विविध राज्यांकडून मार्गदर्शक सूचना जारी
कोरोनाचा धोका लक्षात घेता देशातील विविध राज्यांनी मोहरम संदर्भात आपली मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश मिरवणुकीत गर्दी कमी करणं आणि कोरोना संसर्गाचा प्रसार रोखणं हा आहे.