मुंबईतील उद्योगपती देवेन मेहता यांनी अंबानींच्या अँटिलिया या इमारतीसमोर असणाऱ्या टॉवरमध्ये दोन मजले खरेदी केले आहेत. ४० मजल्यांची ‘लोढा अल्टमाऊंट’ ही अलिशान इमारत मुंबईतील अल्टमाऊंट रोडवर आहे. या घरासाठी मेहता यांनी १ लाख ४७ हजार रुपये प्रती स्क्वेअर फूट इतका दर दिला असून त्यांनी एकूण १२५ कोटी रुपये देऊन हे दोन मजले खरेदी केले आहेत.
मेहता हे स्मार्ट कार्ड आयटी सोल्यूशन्स लिमिटेड या कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. प्रभादेवी येथील गृह नोंदणी कार्यालयाकडून या व्यवहाराला पुष्टी देण्यात आली आहे. या टॉवरमध्ये महागडी घरे खरेदी करणाऱ्यांत श्रीकृष्ण आणि अजय जिंदाल यांचाही समावेश आहे. ‘जिंदाल ड्रग्ज’च्या जिंदाल यांनी २५० कोटी रुपयांना ३ मजल्यांचे पेंटहाऊस खरेदी केले आहे.
लोढा ग्रुप या रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनीचा लोढा अल्टमाऊंट हा एक प्रोजेक्ट आहे. कंपनीचा प्रकल्प अशा प्लांटमध्ये आहे ज्याठिकाणी वॉशिंगटन हाऊस आहे. लोढा अल्टमाऊंट ही इमारत अरबोपतींचे घर म्हणून ओळखली जाते कारण देशातील मोठे उद्योगपती याठिकाणी राहतात असे ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. कुमार मंगलम बिर्ला, गुजरात अंबुजाचे नरोत्तम शेखसारिया आणि डिमार्टचे राधाकृष्णन दमानी हेही याठिकाणी राहतात.